अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत; गेलेले आमदारही शरद पवारांकडे परत येतील!
– हे केवळ लोकसभा निवडणुकीसाठी जुळवलेले गणित – संभाजीराजे
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा छातीठोक दावा स्वराज्य संघटनेचे संस्थापक तजा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. सत्ताधारी भाजपसोबत आलेले राष्ट्रवादीचे ९ आमदार पुन्हा शरद पवार यांना जावून मिळतील, असेही ते म्हणालेत. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा तापले आहे.
संभाजीराजे छत्रपती हे काल मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांकडे परततील, हा सर्व ठरवून झालेला प्लान आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार. अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकांसाठी जुळविलेले गणित आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी तिन्ही सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार तरी कसे? असा सवालही उपस्थित केला.
तुमच्या फाइली पुन्हा टेबलावर येतील – ‘सामना’तून टीका
ईडीच्या कारवाईमुळेच शिंदे गट व अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला, असा आरोप करत आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील, असा इशारा शिवसेनेने (ठाकरे) आपले मुखपत्र दैनिक ‘सामना’तून दिला आहे. ठाकरे गटाने ‘सामना’त म्हटले आहे की, सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी, इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले. ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपच्या गोठ्यात शिरणार्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, २०२४ मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे व शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ”आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील.” महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या बेइमानांना तेव्हा दया नसेल. सत्तेची भूक तोपर्यंत सगळ्यांनीच शमवून घ्यावी, अशी टीकाही करण्यात आली आहे.
————–