केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनाही वाटतं, ‘यंदा तुपकरांचं जमतं’!
– अॅड. शर्वरी तुपकरांनी सांगितलं, ‘दोन मित्रांपैकी एकाने अभ्यास केला, ते डॉक्टर झाले, रविकांत यांनी अभ्यास केला नाही म्हणून शेतकरी नेते झाले’!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – येथील एका खासगी रूग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी चांगल्याच राजकीय कोपरखळ्या रंगल्या. त्याची सुरूवात प्रसिद्ध विधीज्ज्ञ तथा शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या पत्नी शर्वरीताईंनी केली. आपल्या भाषणात त्यांनी, ‘दोन मित्रांपैकी डॉ. सोनवणे यांनी अभ्यास केला, ते डॉक्टर झाले. रविकांत यांनी अभ्यास केला नाही म्हणून ते शेतकरी नेते झाले’, अशी मिश्कील टिपणी केली. या टिपणीला आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तितक्याच मिश्कीलपणे उत्तर दिले. ‘रविकांत हा माझं ऐकत नाही, त्याला सांगा माझा सल्ला ऐका, यंदा जमून जाईल’, असे सांगून अप्रत्यक्षरित्या भाजपात येण्याचे संकेत मंत्री दानवेंनी दिले. त्याला उपस्थितांनीही हसून चांगलीच दाद दिली. ‘यंदा जमून जाईल’, हे दानवेंचे वक्तव्य आगामी लोकसभा निवडणुकीतील यशाशी जोडून पाहिले जात आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष तथा राजकारणातील मुरब्बी राजकारणी म्हणून रावसाहेब दानवेंची ओळख आहे. बुलढाणा येथील एका खासगी रूग्णालयाच्या उद््घाटनप्रसंगी त्यांनी रविकांत तुपकर यांच्यावर मार्मिक भाष्य करत, यंदा त्यांचा खेळ जमणार असल्याचे संकेत दिलेत. या रूग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या सुविद्य पत्नी अॅड. शर्वरी तुपकर म्हणाल्यात की , डॉ. सोनवणे यांनी अभ्यास केला आणि ते डॉक्टर झाले. परंतु रविकांत यांनी अभ्यास न केल्यामुळे ते शेतकरी नेते झाले. शर्वरीताईंच्या या भाषणाचा धागा पकडून, रावसाहेब दानवे म्हणाले की, एकाने अभ्यास केला म्हणून तो डॉक्टर झाला. पण दुसर्याने म्हणजेच रविकांत तुपकर यांनी अभ्यास न केल्यामुळे तो जेलात जातो बाहेर येतो… जेलात जातो बाहेर येतो… पण अजून काही खेळ जमेना. म्हणून ताई त्याला (रविकांत यांना) सांग….घरी जाऊन… मी त्याला अनेक वेळा सल्ला दिला की तुला नेमका दगड मारायचा असेल तर काय करायला पाहिजे… पण तो ऐकत नाही माझं… त्यामुळे असं होत नाही… असं राजकारणात चालत नाही… राजकारणात किती उंच आहे याला महत्त्व नाही, राजकारणात तो गोरा आहे का यालाही महत्त्व नाही, पण लोकांना एकदा का चेहरा पसंत पडला की त्याला राजकारणात महत्त्व येतं. यंदा रविकांत यांचा खेळ जमून जाईल, असे विधान करून मंत्री दानवेंनी आगामी लोकसभा निवडणुकीचा बुलढाण्यातील निकाल काय राहील हेच अधोरेखीत केले. दरम्यान, रावसाहेब दानवेंनी तुपकरांना कोणता सल्ला दिला, आणि तो सल्ला तुपकर ऐकत नाहीत, याबाबतही चर्चा रंगली होती. दानवेंचा तो सल्ला म्हणजे भाजप प्रवेश करण्याचा असावा, असा तर्कही राजकीय नेते लावत आहेत.