Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

‘खासदारकी’साठी संदीप शेळके सज्ज!

– जनता हाच पक्ष, राजकीयांचे आता शेळकेंकडे लक्ष!
– राजकारणात सक्रीय होण्याचे दिले संकेत, राजकीय पक्षात धडकी!

बुलढाणा (प्रशांत खंडारे/अनिल मंजुळकर) – निवडणूक आली की राजकीय पक्ष व उमेदवारांकडून मतदारांना आश्वासने दिली जातात. रस्ते करू, पाणी व वीजसमस्या सोडवू. याच विषयांवर बहुतांश वेळा प्रत्येक पक्ष निवडणूक लढवतो. नागरिकही त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. मतदान करतात. त्यातून काही कारभारी बनतात. पुन्हा पाच वर्षांनी हीच आश्वासने, हेच प्रचाराचे मुद्दे आणि पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती निर्माण होते. पण, आज २८ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात समाजकार्यात अग्रेसर असणारे राजर्षी शाहू बँकेचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’ या उपक्रमाचा शुभारंभ करून खासदारकीची निवडणूक लढविणार असल्याचे ठरवून टाकले आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध विनोदी अभिनेता भरत गणेशपुरे यांची उपस्थिती लाभल्याने अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जनतेचा आग्रह असेल तर आपण लढणारच असा ठाम निर्धार व्यक्त करून जनता हाच आपला पक्ष आणि बुलढाण्याचा चौफेर विकास हाच आपला झेंडा राहणार, असे शेळके यांनी यावेळी नीक्षून सांगितले.

राजर्षी शाहू बँकेचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’ आज घोषित केला.  प्रसिद्ध विनोदी अभिनेता, ‘चला हवा येऊ द्या’फेम भारत गणेशपुरे यांनी आराध्या लॉन्सवर संदीप शेळकेंची प्रकट मुलाखत घेतली. यावर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर संदीप शेळके म्हणाले की, जिल्ह्यातील युवकांचे, शेतकर्‍यांचे, उद्योजकांचे या अभियानाच्या माध्यमातून मते जाणून घेतल्या जातील. दोन महिन्यातच संपूर्ण जाहीरनामा तयार होईल, यातून लोकांना वाटेल तर निश्चितच मी खासदारकी लढणार, अशी घोषणा संदीप शेळके यांनी केली आहे. ‘कोणत्या पक्षाकडून?’ हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही. ‘जनता हाच पक्ष’, असे उत्तर यावेळी ऐकायला मिळाले. ‘वन मिशन बुलढाणा’ आयोजित या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिसून आला. संदीप शेळके यांची मुलाखत राजकीय, विकासात्मक जुगलबंदी ठरली! विदर्भपुत्र गणेशपुरे या हरहुन्नरी कलाकाराने टाकलेल्या प्रश्नावर शेळकेंनी चौफेर-षटकार लगावले तर काहीना ‘डकं’ करीत सफाईदारपणे बगल दिली. तब्बल दोन तास चाललेल्या या मुलाखतीचा जिल्ह्याभरातून आलेल्या विकासप्रेमी नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला. एरवी हास्य- विनोदाचे फवारे उडविणार्‍या भारत गणेशपुरे यांचा ‘मूड’ काहीसा गंभीर होता. प्रारंभीच्या सत्रात जिल्ह्याचा विकास, विकासाची दृष्टी, अनुशेष यावर जोर देत ‘अँकर’च्या भूमिकेतील या कलावंताने नंतर मात्र विनोदाचे रंग उधळत कार्यक्रमाची रंगत अखेरपर्यंत कायम ठेवली.

संवाद यात्रा काढणार!

जिल्ह्यातील जनतेला भेटण्यासाठी आपण लवकरच जिल्हापरिषद सर्कल निहाय संवाद यात्रा काढणार आहोत. यादरम्यान नागरिकांच्या सूचना, निर्देश लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यात जनतेचा जाहीरनामा तयार करणार आहोत. मतदारसंघातील साडेबाराशे गावांत व मतदान केंद्रात समांतर यंत्रणा उभी करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.


समारोपीय सत्र ठरले ‘धडाकेबाज ….

समारोपीय सत्रात भारत गणेशपुरे यांनी विषय थेट राजकारणाकडे वळवित शेळकेंना बॅक फुटवर खेळवत ठेवले. ‘तुम्ही लोकसभा लढविणार काय आणि कोणत्या पक्षाकडून’ हा रोखठोक विचारून त्यांनी शेळकेंना त्यानंतरच्या प्रत्येक राजकीय प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडले! शेळके यांनी, आपण जनतेला भेटण्यासाठी लवकरच जिल्हापरिषद सर्कलनिहाय संवाद यात्रा काढणार आहोत. यावेळी करण्यात येणार्‍या संवाद आणि लेखी स्वरूपात व सोशल मीडियावरून आलेल्या नागरिकांच्या सूचना, निर्देश लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यात जनतेचा जाहीरनामा तयार करणार आहोत. सर्व पक्ष आपला जाहीरनामा मांडतात, पण मी जनतेचा जाहीरनामा मांडणार आहे. तो जनतेच्या पसंतीस उतरला आणि जनतेने आग्रह केला तर आपण बुलढाणा लोकसभा निवडणूक लढविणार, असे त्यांनी जाहीर केले. कोणत्या राजकीय पक्षाकडून लढविणार? या प्रश्नाला बगल देत जनता हाच आपला पक्ष राहील असे शेळके म्हणाले. जनता सोबत असली तर अपक्ष म्हणून दोन हात करणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. मतदारसंघातील साडेबाराशे गावांत व मतदान केंद्रात समांतर यंत्रणा उभी करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. समारोपात भारत गणेशपुरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थितांना बोलके करून प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!