मोदींना संसदेत हवेत तरूण खासदार!
– दोनपेक्षा अधिकवेळा जिंकलेल्यांना आता पक्षकार्याला जुंपणार?
– राज्यसभेत ८० टक्के विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना देणार संधी!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षात जोरदार मंथन सुरू असून, २०२४च्या लोकसभेत जास्तीत जास्त तरूणांना पाठविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी नियोजन चालवले आहे. सूत्राच्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत भाजप १५० तरूण-तरूणींना संधी देणार असून, या उमेदवारांचे वय ४१ ते ५५ च्या आसपास राहील, याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच, दोनपेक्षा अधिकवेळा जिंकलेल्यांना आता पक्ष कार्याला जुंपण्याची तयारीदेखील चालू असल्याचे या सूत्राने सांगितले. त्यामुळे राज्यातील रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यासारखे ज्येष्ठ खासदार आता पक्षाच्या कार्यात उतरविले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपच्या एका महासचिवाने सांगितले, की पहिल्या लोकसभेत २६ टक्के खासदारांचे वय हे ४० पेक्षा कमी होते. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत हे वय वाढत वाढत गेले. सद्या तीन ते ११ वेळा लोकसभा निवडणूक जिंकणार्या सदस्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे यावेळेस पक्षाने ज्येष्ठ सदस्यांना आता पक्षकार्यात उतरवून तरूणवर्गाला संधी देण्याचे निश्चित केले आहे. तसेच, काही अपवाद वगळता दोनपेक्षा जास्तवेळा राज्यसभेत पोहोचलेल्यांना आता पुन्हा राज्यसभेत संधी नाकारली जाणार आहे. कायदा, चिकित्सा, विज्ञान, कला, आर्थिक-सहकार, तंत्रज्ञान, पर्यावरण, भाषा या विभागांतून ८० टक्के तज्ज्ञांना संधी मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. देशात ६५ टक्के युवावर्ग आहे. या युवावर्गाला संसदेत प्रतिनिधीत्व मिळायला पाहिजेत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. जर एखाद्या नेत्याला वारंवार पक्षाची उमेदवारी मिळत असेल, तर तेथील कार्यकर्ते त्या संधीपासून दुरावले जातात. त्यामुळे दोन-तीनवेळा जे सातत्याने निवडून येत आहेत, किंवा पडत आहेत, त्यांना आता संधी न देण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठस्तरावर सुरू असल्याचेही सूत्राने स्पष्ट केले.
सद्या लोकसभेत भाजपचे १३५ खासदार हे पहिल्यांदा विजयी झालेले, तर ९७ खासदार हे दुसर्यांदा निवडून आलेले आहेत. तर मेनका गांधी आणि संतोष गंगवार हे तब्बल आठव्यांदा निवडून आलेले असून, डॉ. वीरेंद्र कुमार सातव्यांदा, आठ खासदार हे सहाव्यांदा, ११ खासदार हे पाचव्यांदा, आणि १९ खासदार हे चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रातील संजय धोत्रे (चौथ्यांदा), रावसाहेब दानवे (पाचव्यांदा) निवडून आलेले आहेत. या नेत्यांचा पक्ष कार्र्यात समावेश केला जाऊ शकतो. तर सर्वात महत्वाचे म्हणजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पक्ष कार्यात जुंपले जाण्याची शक्यता भाजपच्या सूत्राने वर्तविली आहे.
—-