बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन ‘वन मिशन बुलढाणा’ ही लोकचळवळ निर्माण करणारे राजर्षी शाहू परिवाराचे प्रमुख, उद्योजक संदीप शेळके यांना आता लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. ‘वन बुलढाणा मिशन’ ते ‘मिशन लोकसभा’ असा त्यांचा रंजक राजकीय प्रवास होऊ घातला आहे. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर, संदीप शेळके या तरुणांविरोधात प्रतापराव जाधव, प्रा. नरेंद्र खेडेकर असे मुरब्बी दिग्गज असा सामना जिल्ह्याच्या राजकीय आखाड्यात रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘जाहीरनामा जनतेचा’ या नागरी अभियानाचा प्रारंभ बुलढाण्यातून होत असून, यानिमित्त संदीप शेळके यांची प्रगट मुलाखत हास्यअभिनेते भारत गणेशपुरे हे घेत आहेत. या कार्यक्रमाकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागलेल्या आहेत.
लोकसभा निवडणूक सहा ते सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे, राजर्षी शाहू परिवाराचे संदीप शेळके यांनीदेखील मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करत, लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यादृष्टीने ‘जाहीरनामा जनतेचा’ या नागरी अभियानाचा ते रविवारी शुभारंभ करत आहेत. त्याचा प्रमुख कार्यक्रम दुपारी १२ वाजता चिखली रोडवरील आराध्या लॉन्स येथे होत आहे. यावेळी प्रसिद्ध हास्यअभिनेते भारत गणेशपुरे हे संदीप शेळके यांची प्रगट मुलाखत घेणार असून, या मुलाखतीतून ते आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. सद्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळले गेले आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात जिल्ह्यात नकारात्मक वातावरण आहे. तर महाविकास आघाडीत बुलढाण्याची जागा शिवसेनेकडे (ठाकरे) असल्याने व ही जागा सोडणार नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले असल्याने लोकसभा लढविण्यासाठी सज्ज झालेले हर्षवर्धन सपकाळ यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. शिवाय, काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांचाही हिरमोड झाला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांच्या इराद्यावर पाणी फेरले गेले आहे. दुसरीकडे, बुलढाण्याची जागा भाजप लढविण्याची शक्यता असून, सद्या येथून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. आता ते भाजपच्या चिन्हावर लढणार? की शिंदे गटाला मिळालेले धनुष्यबाण हे चिन्ह हाती घेणार हे नजीकच काळात स्पष्टच होईल. तथापि, प्रतापराव हे शिंदे गट किंवा भाजप कुठूनही लढले तरी त्यांचा सामना करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे सज्ज आहेत. एकीकडे, प्रतापराव जाधव-नरेंद्र खेडेकर हा सामना तूर्ततरी फिक्स वाटत असला तरी, शेतकरी नेते रविकांत तुपकर व संदीप शेळके हे तरूण व लोकप्रिय चेहरेही लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याने आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. जिल्ह्यात परिवर्तन अटळ असले तरी, नवी दिल्लीत तरूण की साठी ओलांडलेला खासदार जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संदीप शेळके यांनी विविध उपक्रम व सहकाराच्या माध्यमातून गावोगावी संपर्क प्रस्थापित केला असून, त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार नेटवर्क व जनसंपर्क तयार केलेला आहे. तसेच, त्यांच्याकडे जिल्हा विकासाचे व्हीजन आहे. आजपर्यंत झालेल्या खासदारांनी जिल्ह्याच्या माथी मागासलेपणाचा कलंक लावला. त्यामुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रगतीपथावर न्यायचे असेल तर तरूण व व्हीजन असलेला खासदार निवडून जाणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘वन बुलढाणा मिशन’ या लोकचळवळीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले संदीप शेळके आता ‘मिशन बुलढाणा लोकसभा’ हाती घेणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. त्यादृष्टीने आजचा ‘जाहीरनामा जनतेचा’ हा कार्यक्रम बुलढाणावासीयांसाठी महत्वपूर्ण ठरणार असून, संदीप शेळके काय घोषणा करतात? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
आजच्या कार्यक्रमाचे गावोगावी पोहोचले निमंत्रण!
आज, दि.२७ ऑगस्टरोजी बुलढाणा येथील चिखली रोडवरील आराध्या लॉन्स येथे आयोजित ‘जाहीरनामा जनतेचा’ हा कार्यक्रम म्हणजे संदीप शेळके यांचे शक्तिपरीक्षण ठरण्याची शक्यता आहे. कारण, या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांच्या सहकार्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावागावांत दिले आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ‘जाहीरनामा जनतेचा’ या मोहिमेचा शुभारंभ आज होणार असून, या मोहिमेतून बुलढाणा जिल्हा विकासाचे मॉडेल मांडले जाणार आहे.