LONARVidharbha

अतिक्रमणधारकांची नोंद न घेण्याच्या तलाठ्यांच्या अडेलतट्टू भूमिकेचा मुद्दा पेटला!

लोणार (विजय गोलेच्छा) – वंचित बहुजन आघाडी लोणार तालुक्याच्यावतीने लोणार तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतमजूर यांच्या अतिक्रमणाची अतिक्रमण नोंदवहीत नोंद घ्यावी, या मागणीसाठी आमरण उपोषण तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, अशी नोंद घेण्यास तलाठी अडेलतट्टू भूमिका घेत असल्याने हा मुद्दा सद्या तालुक्यांत गंभीर वळण घेऊ लागल्याचे दिसून येत आहे.

लोणार तालुक्यामध्ये असलेल्या गोरगरीब लोकांनी शासकीय ई-क्लास गायरान जमिनीवर असणारे दगडधोंडे, लहान लहान काटेरी झुडपे, काढून रक्ताचे पाणी करून पडिक असलेल्या जमिनी सुपीक बनविल्या आहेत. या सुपीक केलेल्या जमिनीवर या शेतमजूर भूमीहिन कष्टकरी लोकांचे कुटुंबांचे पालन पोषण होते. तसेच त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण संगोपन व उदरनिर्वाह होतो. अशा सर्व शेतमजूर भूमिहीन असणार्‍या लोकांनी केलेल्या अतिक्रमित जमिनीची नोंद संबंधित तलाठी हे अतिक्रमण नोंदवहीत घेत नाहीत. आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत या अतिक्रमणाची माहिती पोहोचवत नाहीत. तरी अशा अतिक्रमणांची नोंद अतिक्रमण नोंदवहीत घेण्यास आपल्या कार्यालयातील तलाठ्यांना आदेशित करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे आज ह्या मुख्य मागणीसह गावठाण हद्दीतील अतिक्रमण नियमानुकूल करावे, या मुख्य मागणीसह मौजे अंजनी खुर्द येथील दलित वस्ती मधील सिमेंट रोडच्या कामाची चौकशी करून कार्यवाही करावी, मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी युवा शाखेच्यावतीने गौतम गवई युवा तालुका अध्यक्ष, महासचिव पवन अवसरमोल यांनी लोणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण प्रारंभ केले आले आहे.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड, तालुका अध्यक्ष दिलीप राठोड, मातीताई कळंबे महिला सदस्य, दीपक अवसरमोल, नरेंद्र सरदार, रमेश आंधळे, रमेश प्रधान, प्रवीण मोरे उपसरपंच गायखेड, अभिमान मोरे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष वझर आघाव, सर्जेराव मोरे, दामोदर खोटे, विकास मोरे, अक्षय जाधव, जीवन अंभोरे, आकाश प्रधान, मालताबाई साठे, मीना खोटे, आदींसह बरेच महिला पुरुष अतिक्रमणधारक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!