राज्यातील कृषी हवामानतज्ज्ञांना पाच महिन्यांपासून पगारच नाही!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेतकर्यांना हवामान अर्थात पाऊस पाण्याचा अंदाज सांगण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राज्यातील कृषी हवामानतज्ज्ञांचे पगार गेल्या पाच महिन्यांपासून रखड़ल्याने त्यांना संसाराचा गाड़ा हाकणे जिकरीचे झाले असून, याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी केद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजीजू यांच्याकड़े या कर्मचार्यांच्या संघटनेने केली आहे.
गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलामुळे कृषीक्षेत्रात हवामानविषयक सल्ला, अंदाज अतिशय मोक्याची भूमिका बजावत आहेत. हाच हवामानाचा अंदाज शेतकरी बंधूपर्यंत पोहोचविणे व त्यावर आधारीत कृषी सल्ला पत्रिका तालुकानिहाय, पीकनिहाय कृषी शास्त्राच्या आधारे तयार करणे व त्याचा आठव़ड्यात दोनदा म्हणजे मंगळवारी व शुक्रवारी शेतकरी बांधवांपर्यत पोहोचविणे यासाठी केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने देशात जिल्हा कृषी हवामान केंद्रे स्थापन केली असून, तेथे ३७८ कृषी हवामानतज्ज्ञ काम करतात. राज्यातही ११ कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आली असून, तेथे २२ कृषी हवामानतज्ज्ञ कार्यरत आहेत. सदर कृषी हवामानतज्ज्ञ एवढे अवश्यक व महत्वाचे काम सांभाळत असताना गेल्या एप्रिलपासून त्यांचे पगार मात्र रखड़ल्याने संसाराचा गाड़ा हाकणे जिकरीचे झाले आहे. तरी रखड़लेले पगार देण्याबाबत कार्यवाही व्हावी व इतरही समस्यांचे निराकरण करावे, अशी रास्त मागणी सदर कर्मचारी संघटनेने पृथ्वी-विज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांच्याकड़े केली आहे.
या कर्मचार्यांच्या विविध मागण्यांबाबत आपण लवकरच संबंधित केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांच्यासह केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेणार असल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामानतज्ज्ञ मनेश येदुलवार यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
अनेक चांगल्या हवामानतज्ज्ञांनी सोडल्या नोकर्या!
विशेष म्हणजे, नुसते महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यातही या हवामानतज्ज्ञ कर्मचार्यांचे वेतन रखड़ले असून, याला कंटाळून काही चांगल्या हवामानतज्ज्ञांनी केंद्र सरकारची ही नोकरीदेखील सोड़ल्याची धक्कादायक माहिती समजली आहे.
केंद्रीय मंत्र्यांना हवामानतज्ज्ञांच्या संघटनेने दिलेले पत्र वाचण्यासाठी येथे क्लीक करा..