जिल्ह्यात चार महिन्यात साड़ेआठ हजार वीजजोड़ण्या; वसुलीचा टक्का मात्र जेमतेम!
– ‘इझ ऑफ लिव्हींग’मध्ये ग्राहकांना तत्पर सेवा; बुलढाणा जिल्ह्यातून झाली सुरूवात!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यात जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी अशा विविध वर्गवारीतील ८ हजार ७६७ ग्राहकांना नवीन वीज जोड़ण्या देण्यात आल्या. परंतु ऑगस्ट महिन्याच्या २४ दिवसात उद्दिष्टाच्या केवळ ३८ टक्के वीजबील वसुली झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत बील भरून सहकार्य करावे, असे आवाहन वीजवितरण अकोल्याचे मुख्य अभियंता दत्तात्रय पड़ळकर यांनी केले. ‘इझ ऑफ लिव्हींग’नुसार सुरळीत सेवेबरोबर २४ तासांत वीजजोड़णी देण्यासाठी महावितरण यंत्रणा प्रयत्नशील असून, याची सुरूवात बुलढाणा जिल्ह्यातून करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
राज्य वीज वीतरण कंपनीच्या येथील पोलीस विभागाच्या सभागृहात आयोजित बुलढाणा मंड़ळाच्या आढावा सभेत ते बोलत होते. इझ ऑफ लिव्हींगमध्ये वीजपुरवठा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यानुसार तात्काळ वीज जोड़णीसह इतर सेवा तत्परतेने देण्याबाबत महावितरणचे अध्यक्ष लोकेशचंद्र यांनी संबंधितांना आदेश दिले आहेत. त्यानुसार अकोला परिमंड़ळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पड़ळकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील नवीन वीजजोड़ण्या, खंड़ीत वीजपुरवठा, बिलींग व इतर तक्रारी निपटार्याला वेग येण्यासाठी तसेच वीजबील वसुलीबाबत देखील आढावा घेतला. खामगाव विभागात अद्याप ९ कोटी ३५ लाख वसुली बाकी असून, बुलढाणा व मलकापूर विभागातूनही या कालावधीत अनुक्रमे ७ कोटी ५२ लाख व ६ कोटी ५९ लाख वसुली येणे बाकी आहे. ऑगस्ट महिन्याच्या २४ दिवसात केवळ ३८ टक्के वसुली झाल्याने ही महावितरणसाठी चांगली बाब नाही, असे म्हणत वसुलीसाठी शाखा अभियंता निहाय उद्दिष्ट देण्यात आले असून, हयगय केल्यास गय नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, कार्यकारी अभियंता प्रशासन बद्रीनाथ जायभाये, विभागीय कार्यकारी अभियंता सर्वश्री मंगलसींग चव्हाण, वीरेंद्रकुमार जस्मेतिया, रत्नदीप तायड़े, व्यवस्थापक मनिषकुमार कदम यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते व शाखा अभियंते उपस्थित होते.
जिल्ह्यात महावितरणचे दोन महिन्यात ५० कोटी वसूल!
जिल्ह्यातील गेल्या जून व जूलै महिन्यात महावितरणची ५० कोटीची वसुली झाली असून, देरके भरण्यासाठी लाखाचेवर ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात एक लाख सहा हजार तर जुलै महिन्यात एक लाख सोळा हजार ग्राहकांकड़ून अनुक्रमे २४ व २५ कोटी अशी एकूण ५० कोटीची वसुली झाली आहे. ़डिजीटल इंड़िया इनिशिएव्हटीचा भाग म्हणून महावितरणच्या ग्राहकांना ऑनलाइन वीजबील भरण्यासाठीची सुविधा असून, यामध्ये ०.२५ टक्के म्हणजे जास्तीत जास्त पाचशे रूपये सवलतदेखील देण्यात येते. याचा लाखाच्यावर ग्राहकांनी लाभ घेतला आहे.
———–