– जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची पत्रकार परिषदेत माहिती
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात जिल्हास्तरीय कार्यक्रम बुलढाणा येथे मंगळवारी (दि.२९) दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. परिवहन महामंडळाच्या मागील कर्हाडे ले आऊट येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला २५ हजार लाभार्थी उपस्थित राहण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या, शासनाच्या विविध विभागांसोबत महिला आर्थिक विकास महामंडळ, बचतगटांचा यात सहभाग असणार आहे. आतापर्यंत पाच लाख ७५ हजार लाभार्थ्यांना या अभियानात लाभ देण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दिवशी आणखी दीड लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानात आणखी लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध विभागांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेमागील जागेत मंडप उभारण्यात येणार आहे. याठिकाणी रोजगार मेळावा, आरोग्य शिबीरासह विविध विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना आणण्यासाठी ३५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना डीबीटी, धनादेश, साहित्य वाटप आदी लाभाचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार आहे. त्यासोबत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले ७० हजार शेतकर्यांना लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. शासन आपल्या दारी अभियानातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती विसपुते यांनी केले.