सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – तालुक्यातील साखरखेर्डा येथील पुरातन प्रसिद्ध पलसिद्ध महास्वामीच्या मठामध्ये श्रीमद् जगद्गुरु पलसिद्ध शिवाचार्य महास्वामीजींचा ९६५ वा स्मृति महोत्सव मोठ्या उत्साहात नामवंत गुरूवर्यांच्या देशभरातून येणार्या भक्तजणांच्या उपस्थितीत भावभक्तीपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. मिती श्रावण वद्य ३ ते श्रावण वद्य ५ अर्थात २,३ व ४ सप्टेंबर असे तीन दिवस भरगच्च धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार्या या महास्वामीजींच्या स्मृतिमहोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटकातून हजारो शिवभक्त हजर राहणार आहेत. येथील पुरातन श्रीमद जगद्गुरु पलसिद्ध महास्वामींचा मठ हा साखरखेर्डाच्या उत्तरेकडील भागात सुमारे नऊशे वर्षांपूर्वी स्थापन झालेला आहे.
समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी उच्च व उदात्त मूल्यांचा पुरस्कार करणार्या वेदाघम प्रसिद्ध अशा श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यांनी शिवमय जगत हा समानता संदेश विश्वाला देण्यासाठी वीरशैव धर्माची स्थापना केली. पंचाचार्य जगद्गुरुंनी व शिवाचार्यांनी शूद्र, ब्राह्मण, स्त्री- पुरुष, उच्च-नीच असा भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार सांगणारी परंपरा भारत देशात उज्वल केली. याच परंपरेत उज्जयनी सिंहासनाधीश्वर १००८ श्रीमद् जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी हे दहाव्या शतकात होऊन गेले. त्यांनी धर्मप्रसारासाठी उत्तर-दक्षिण भारतभर संचार केला. नंतर श्री क्षेत्र साखरखेर्डा येथे धर्म पिठाची स्थापना केली. आणि नंतर येथील पलाशवृक्षाखाली संजीवनी समाधी घेतली. आपल्या धर्माप्रचार यात्रेत त्यांनी अनेक दिन दुबळ्यांचा उद्धार करून अज्ञानी व धर्म भ्रष्ट लोकांना दिव्य उपदेशाने सन्मार्ग दाखवून उपकृत केले. बसवपूर्वकालीन धर्माचार्य म्हणून वीर शिवधर्मात वीरशैव धर्मात व इतिहासात त्यांची ख्याती आहे. अशा श्रीमद् जगद्गुरु प्रसिद्ध पलसिद्ध शिवाचार्य महास्वामीजींचा ९६५ वा स्मृति महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील धर्म पिठात श्री. प. पू. ष.ब्र. १०८ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय साजरा केला जाणार आहे. या स्मृती महोत्सवाला महाराष्ट्राच्या विविध भागातील गुरुवर्य यांची हजेरी लाभणार असून त्यांच्या आशीर्वचनाचा व दर्शनाचा लाभ होणार आहे. त्यामध्ये सद्गुरु सिद्धदयाल शिवाचार्य महाराज, (बेटमोगरा; जि. नांदेड), सद्गुरु वेदांताचार्य दिगांबर शिवाचार्य महाराज ( थोरला मठ,वसमत जि. हिंगोली), सद्गुरु शिवशंकर शिवाचार्य महाराज (नेर पिंगळाई ,जि. अमरावती), सद्गुरु मरूळसिद्ध शिवाचार्य महाराज(कारंजा, जि. वाशिम), सद्गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज (मठ संस्थान पाथरी, जि. परभणी), सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज (पलसिध्द मठ, साखरखेर्डा, जि. बुलढाणा), शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, (हदगाव ,जि. नांदेड), विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज(आष्टी लक्ष्मणाची, ता. परतुर, जि.जालना), वेदमूर्ती कैलासलिंग स्वामी( तळेगाव देशमुख) आणि पंडित शिवाप्पा खके गुरुजी (चारठाणा) श्री अनिल स्वामी, (परभणी) या गुरुवर्यांची आवर्जून हजेरी राहणार आहे.
या स्मृती महोत्सवाचा प्रारंभ ता. २ सप्टेंबरला स.६.०० वा. नामस्मरण एक्का प्रारंभाने होणार असून दु.१२.०० वा. शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी व बाहेर गावाहून येणार्या दिंड्यांचे स्वागत होणार आहे. सायं. ४.०० वा. दिंड्यासह नगरातील मुख्य रस्त्यावरून पालखी मिरवणूक होणार आहे. रात्री ८.०० वा. आळंदी येथील भजन सम्राट पंडित कल्याणजी गायकवाड यांच्या सुमधुर आवाजात लक्ष्मणाची अभंग वर्षा होणार आहे. रात्री १०.०० वा. शिव जागरण होईल. श्रावण वद्य ४,रोज रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी स.६.०० वा. नामस्मरण एक्क समाप्ती, स. ७.०० वाजता श्रीच्या मूर्तीस व संजीवन समाधीस रुद्राभिषेक व महापूजा, स. १०.००वा. हिवरा आश्रम येथील श्री.अभय मासोदकर व श्री शशिकांत आप्पा बेंदाडे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. स. १०.३० ला नांदेड येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. श्री शशिकांतजी दरगू यांचे सर्व समन्वयात्मक वीरशैव लिंगायत धर्म या विषयावर व्याख्यान होणार आहे. दु.१२.०० वाजता श्री.प.पू.ष.ब्र. वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचा सत्कार समारंभ व महाराष्ट्रभरातून आलेल्या गुरुवर्यांची आशीर्वचने होणार आहेत. दु. २.०० ला उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे. श्रावण वद्य ५, वार सोमवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी स.७.०० वाजता श्रीच्या मूर्तीस व संजीवन समाधीस रुद्राभिषेक होणार असून, सकाळी नऊ वाजता सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, हदगावकर यांचे प्रसादाचे कीर्तन होणार आहे. नंतर सकाळी ११.०० वाजता धर्मसभा होणार असून, महाराष्ट्रातून आलेल्या गुरुवर्यांचे आशीर्वचन होणार आहे. ता. ३ ला दु. २.०० वाजता महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
———–