बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन कार्यरत वन बुलढाणा मिशनच्यावतीने रविवारी, २७ ऑगस्ट रोजी ‘जाहीरनामा जनतेचा’ या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चिखली रोडवरील आराध्या लॉन्स येथे दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रसिद्ध विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे हे राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांची मुलाखत घेणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्हा हा विदर्भातील सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु इतके वर्ष उलटूनदेखील जिल्ह्याची ही ओळख मात्र बदललेली नाही. याकरिता नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. याच उद्देशाने राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी ‘वन बुलढाणा मिशन’ ही चळवळ सुरु केली आहे. केवळ एकाच क्षेत्रात नव्हे तर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या ध्येयासाठी ही लोकचळवळ कार्यरत आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी करणार योजना तयार!
जाहीरनामा जनतेचा या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत जाऊन जिल्ह्याच्या विकासासंदर्भात त्यांची मते, सूचना आणि संकल्पना समजून घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यटन, महिला सक्षमीकरण, दळणवळण अशा सर्वच क्षेत्रात विकासाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यातील समर्पक सूचनांचे संकलन करून येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी एक योजना तयार करणार असल्याचे संदीपदादा शेळके यांनी सांगितले.
विकासाच्यादृष्टीने आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर नेण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी जिल्ह्यावासीयांचा प्रतिसाद गरजेचा आहे. नागरिकांचा पुढाकार या कार्याला जिल्ह्यात एक लोकचळवळ करेल, असा विश्वास आहे.
– संदीप शेळके, अध्यक्ष राजर्षी शाहू परिवार
सामाजिक कार्याचा वसा..!
राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी सामाजिक कार्याचा वसा घेतला आहे. जिल्हाभरात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. रोजगार, महिला सक्षमीकरण, बचत गट, शेतकर्यांना बांधावर खत, रक्तदान शिबिरे, युवक मेळावे, माजी सैनिक मेळावे यासह विविध लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातही शेकडो तरुणांना जागेवर नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध केला आहे.