खामगाव (भागवत राऊत) – माहेरून दुचाकी व एक लाख रूपये घेऊन ये म्हणून विवाहितेला मारहाण करत अतोनात छळ करण्यात आला. एवढेच नाही तर तिला घराबाहेरही काढून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदुरा येथे उघडकीस आला आहे. पैशासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करणार्या पती, नणंद, सासर्याविरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे, की नांदुरा माहेर असलेल्या सौ. दीपाली सुनील बोदडे (वय २७, रा.सोनोटी ता. बोदवड जि.जळगाव खान्देश) ह.मु. नांदुरा यांना त्यांचे पती सुनील सुभाष बोदडे, नणंद सुशीला यशवंत गवई, सासरे सुभाष बोदडे हे सर्व रा. सोनोटी, ता. बोदवड, जि. जळगाव खान्देश यांनी ७ ऑगस्ट २०१८ ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यन्त माहेरहून दुचाकी घेण्याकरिता एक लाख रुपये घेवून ये, तरच तुला वागवितो नाही तर नाही, अशा धमक्या दिल्या. पती सुनील बोदडे व नणंद सुशील गवई यांनी वेळोवेळी मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. या त्रासाला कंटाळून सौ.दीपाली सुनील बोदडे यांनी तशी तक्रार नांदुरा शहर पोलीस स्टेशनला दिनांक २५ ऑगस्ट रोजी दिली आहे. या तक्रारींवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नापोकॉ वराडे हे करीत आहेत.