मेहकरमध्ये शोककळा, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, व्यापारी प्रतिष्ठाणे बंद
बुलढाणा / मेहकर (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे लहान बंधू तथा मेहकरचे माजी नगराध्यक्ष संजय गणपतराव जाधव (वय ५०) यांची शुक्रवारी (दि.२५) छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन रूग्णालयात प्राणज्योत मालवली. यानिमित्ताने एक झंझावात कायमचा थांबला आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशीरा जानेफळ रोडवरील स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मेहकरवासीयांची उपस्थिती होती. रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम २९ ऑगस्टरोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे.
संजय जाधव हे पोटाच्या विकाराने मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मृत्यूसोबतची त्यांची लढाई आज दुपारी कायमची थांबली. संजय जाधव हे मेहकर नगरपालिकेचे काही काळ अध्यक्ष व गटनेते देखील राहिले आहेत. एक धाडसी व कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते परिचीत होते. खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारयंत्रणेत ते नेहमीच अग्रेसर असायचे. विशेषतः युवावर्गात त्यांची वेगळी छाप होती. त्यांचा स्वभाव रोखठोक व धाड़सी होता. तसेच तरूणवर्गात ते विशेष लोकप्रिय होते. खा. प्रतापराव जाधव हे शिंदे गटात गेल्यानंतर संजय जाधव यांनी ठाकरे गटात राहण्याचा निर्णय घेतल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतर मात्र संजय जाधव यांचे मन वळविण्यात खा. जाधव यांना यशदेखील आले होते.
एक उमदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मेहकरात येताच मेहकर येथील व्यापारीवर्गाने आपली दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्च्यात चार भाऊ, एक बहीण, पत्नी, मुलगी, मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. संजय जाधव यांच्या पार्थिवावर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, उपजिल्हाप्रमुख आशीष रहाटे, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशाेकभाऊ थोरहाते, माजी नगराध्यक्ष कासम गवळी, ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक बाळू वानखेडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची व मेहकरवासीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.