शरद पवारांच्या ‘गुगली’ने राज्याचे राजकारण ढवळले!
– भाजपसह महाविकास आघाडीच्या डोक्यालाही झिणझिण्या!
– कायदेशीर लढाईसाठी विचारपूर्वक वक्तव्य, की राजकारणात नवा डाव? – चर्चा रंगल्या
बारामती (सोनिया नागरे) – ‘पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लगेच त्याला पक्षात फूट पडली, असे म्हणू शकत नाही’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा तसेच त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कालच्या ‘अजितदादा पवार आमचे नेते असल्याच्या’ मतांचे समर्थन केले. तसेच अजितदादा आमचे नेते आहेत, हे सुप्रिया सुळेंचे विधान योग्यच असल्याचे पवार यांनी सांगून, राज्याच्या राजकारणात नवी गुगली टाकली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढला आहे. दुसरीकडे, पक्ष वाचविण्याच्या कायदेशीर लढाईसाठी पवारांनी असे वक्तव्य केले असावे, अशी चर्चा रंगली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा आहे. या सभेसाठी रवाना होण्याआधी बारामती येथे पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केलेली काही वक्तव्ये बुचकळ्यात पाडणारी होती. त्यांनी, अजित पवार व त्यांच्या सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे नमूद करत आपल्या पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा केला. तत्पूर्वी, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंनीही काल असाच दावा केला होता. या दोघांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काहीतरी मोठे शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार २०१९ सारखे पुन्हा स्वगृही परत येणार का? अशी चर्चा सुरू राज्यात पुन्हा सुरू झाली आहे. दुसरीकडे, पक्ष वाचविण्याच्या कायदेशीर लढाईसाठी पवारांनी असे वक्तव्य केले असावे, अशी चर्चा रंगली होती.
एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असे म्हटले जाते. पण सुप्रिया सुळे यांनी फूट वगैरे काहीही नसल्याचे म्हटले. तसेच अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असेही त्या म्हणाल्या होत्या. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे, याबाबत आपले मत काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. याचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले, ‘हो ते (अजित पवार) आमचेच नेते आहेत. त्यात काही वाद नाही. पक्षात फूट कधी असते? जर देशपातळीवर एखादा गट वेगळा झाला तर त्याला फूट म्हटले जाते. पण अशी स्थिती आमच्या पक्षात नाही. काही लोकांनी पक्ष सोडला किंवा काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचे काहीही कारण नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे’, असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे आमच्यासोबत येतील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार त्यावर रागावले. यावेळी ‘काहीही फालतू प्रश्न विचारता का,’ असा प्रतिप्रश्न पवारांनीच पत्रकाराला केला.
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नव्या चर्चा सुरु झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नसून, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. सुप्रिया सुळेंच्या यांच्या या विधानाची चर्चा असतानाच आता शरद पवार यांनीदेखील अजितदादा पवार आमचेच नेते असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, भाजपचेदेखील इंडिकेटर लागले आहेत. एकीकडे अजितदादा पवार हे भाजपसोबत आहेत.
दुसरीकडे, शरद पवार व संपूर्ण पक्ष हा भाजपविरोधात आहेत. त्यामुळे हे काका-पुतणे नेमके कोणती खेळी करत आहेत, हेच भाजपच्या नेत्यांना समजत नसल्याने ते गोंधळात पडले असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पवार व सुळे यांच्या या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवारांना अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य वाटत असेल. त्यामुळेच ते असे बोलत असतील, असे मुनगंटीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत. तर, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन असे लक्षात येते किंवा असा अंदाज लावू शकतो की, महाराष्ट्राला आणि देशाला अजित पवार रिटर्न्स भाग- २ लवकरच बघायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, काहीही झाले तरी मी भाजपसोबत जाणार नाही. मी इंडिया सोबत राहणार आहे, असे लोंढे म्हणालेत. निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचविण्यासाठी शरद पवारांनी हे वक्तव्य केले असावे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. पण शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. हा प्रतिक्रियांचा धुरळा सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी त्यात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी तर पवारांची वक्तव्ये पाहाता, डोकं फुटायची वेळ येईल, असे विधानच केले आहे.