BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

आ. रायमुलकरांपासून जीवाला धोका, बरेवाईट झाल्यास तेच जबाबदार!

– मला मारण्यासाठी चार माणसे घरी पाठवली होती, लेखी पत्रातून आरोप
– वानखेडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर राज्यात दलित समाज पेटून उठणार; शिंदे – फडणवीस सरकारला भोगावे लागणार गंभीर परिणाम : समाजातून संतप्त भावना

मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर-लोणार मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यापासून माझ्यासह कुटुंबीयांच्या जीवाला धोका असून, आमच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास आमदार रायमुलकर हेच जबाबदार राहतील. त्यांनी भूषण घोडे, अमोल ठोकरे यांच्यासह चार माणसे आपल्या मारण्यासाठी मेहकरवरून पाठवली होती. या लोकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असून, आमदारांनी केलेली अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीची ऑडिओ क्लीप तर यापूर्वीच व्हायरल झालेली आहे. तेव्हा आ. रायमुलकर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, आणि त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करत, आपण व आपले कुटुंबीय असुरक्षित असल्याची लेखी वैâफियत पीडित ग्रामपंचायत सदस्य गजानन नामदेव वानखेडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे दाखल केलेली आहे. दरम्यान, वानखेडे यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या केसाला जरी धक्का लागला तर राज्यातील दलित समाज पेटून उठेल, व त्याचे गंभीर परिणाम राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला भोगावे लागतील, अशा संतप्त प्रतिक्रिया दलित समाजातून उमटत आहेत.

साबरा गावाचे दलित समाजातील ग्रामपंचायत सदस्य गजानन नामदेव वानखेडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे सविस्तर वैâफियत दाखल केलेली आहे. त्यात नमूद आहे, की खासदार प्रतापराव जाधव यांच्या सांगण्यावरून आपण आमदार संजय रायमुलकर यांच्याकडे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी भेट पास मागितल्या होत्या. त्यावरून त्यांनी आपल्याला फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आ. रायमुलकर यांनी आपल्याला आआ-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ तर केलीच आपण दलित समाजावरही शिवीगाळ केली. तसेच, साबरा गावात पोरं पाठवून जीवे मारण्याची धमकी देत, त्यांना समजावून सांगण्यास गेलेल्या आपल्या भावालाही अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर आमदारांच्या सांगण्यावरून मेहकरवरून भूषण घोडे, अमोल ठोकरे यांच्यासह चारजण साबरा गावात घरी येऊन त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली व दलित समाजावरही अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आमदारांनी केलेल्या शिवीगाळची ऑडिओ क्लीप व्हायरल झालेली आहे. तरी, आ. रायमुलकर यांच्यावर गुन्हे दाखल होऊन, त्यांची आमदारकी रद्द व्हावी, अशी मागणीही वानखेडे यांनी केली आहे. तसेच, आ. संजय रायमुलकर यांच्यापासून आपल्यासह कुटुंबीयांच्या जीवाला धोका असून, माझे किंवा कुटुंबीयांचे काही बरेवाईट झाल्यास आ. संजय रायमुलकर हेच जबाबदार राहतील, असेही पीडित ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे यांनी या वैâफियतमध्ये लेखी दिलेले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस आता काय कारवाई करतात, याकडे सर्व दलित समाजाचे लक्ष लागलेले आहे.


वानखेडेंसह कुटुंबीयांना पोलिस संरक्षणाची मागणी ऐरणीवर!

दरम्यान, साबरा गावाचे दलित समाजातील ग्रामपंचायत सदस्य गजानन नामदेव वानखेडे यांना आमदार संजय रायमुलकर यांनी केलेली अश्लील शिवीगाळ व दिलेली जीवे मारण्याची धमकी, तसेच त्यांना मारण्यासाठी घरी गुंड पाठवणे या प्रकारामुळे दलित समाजात संतापाची लाट उसळलेली आहे. यापूर्वी मेहकरात सर्वपक्षीय नेते यांनी मोर्चा काढून आ. रायमुलकरांचा निषेध नोंदविला होता. शिवाय, दलित पँथर संघटनेनेदेखील मोर्चा काढून निषेध नोंदविला होता. त्यामुळे गजानन वानखेडे व वानखेडे कुटुंबीयांचे काही बरेवाईट झाल्यास राज्यातील दलित समाज पेटून उठेल. त्याचे गंभीर परिणाम बंडखोरी करून सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला भोगावे लागतील, अशा प्रतिक्रिया दलित समाजातून उमटू लागल्या आहेत. तेव्हा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही समाजातून पुढे आली आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!