BULDHANAVidharbha

तांदुळवाडीच्या अपघातग्रस्त पोलिस पाटलांस संघटनेकडून ३७,५०० रूपयांची मदत!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मलकापूर तालुक्यातील ग्राम तांदुळवाडी येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बोरले यांचा काही महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांचे लाखो रुपये खर्च झाले होते, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली होती. त्यामुळे त्यांना आज (दि.२४) बुलढाणा जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघाकडून ३७,५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

श्रीकृष्ण बोरले पाटील आपल्या पोलीस पाटील पदाचे कर्तव्य बजावत असताना, पोलीस स्टेशनला काम आटपून घरी परत येत असताना त्यांचा गंभीर अपघात झाला, त्या अपघातात बोरले पाटील गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांचा अपघात एवढा भयानक होता की त्यांच्या मानेचे काही मणके अक्षरशा तुटले, आणि त्यामध्ये त्यांचा चेहरा सोडता इतर शरीरातील सर्व चेतना नाहीसी झाली, पाटील फक्त बोलू आणि बघू शकतात बाकी शरीराची हालचाल करू शकत नाहीत. बर्‍हाणपूर येथे एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले, तिथे पाटलांचे एक मोठे ऑपरेशन झाले होते, पण दुर्दैवाने ऑपरेशन यशस्वी झाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकली नाही.
बोरले पाटलाची आर्थिक परिस्थिती जेमतेम त्यात अगोदरच्या वर्षी मुलीचे लग्न झाले. त्यात हे एव्हढे मोठे संकट आले, जवळ असलेले पैसे आणि आपल्या नातेवाईकांकडून मिळालेली मदत, सर्व उपचारासाठी खर्च करून पाटलांच्या तब्येतीत फरक नाही. काही महिने बुलढाणामध्ये रूम करून तिथेसुद्धा उपचार घेतलेत, परंतु फारसा फरक पडला नव्हता. त्यांच्या उपचारासाठी जवळच सर्व पैसा संपला. बोरले पाटील हे स्वाभिमानी असल्याने त्यांनी स्वतः तहसीलदारांकडे आपल्या अपघाताची माहिती देऊन बिनपगारी रजा मागवून घेतली आहे. त्यामुळे आता मानधनसुद्धा मिळत नाही. पैसेअभावी बोरले पाटलांना घरी परत आणले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन बुलढाणा जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघाचे सहसचिव योगेश यांच्या संकल्पनेतून मदत देण्यासाठी दिनांक २०/०८/२३ रोजी मलकापूर रेस्ट हाऊसला मलकापूर तालुका अध्यक्ष गजानन तायडे यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भामद्रे राज्य मार्गदर्शक गजाननराव भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीमध्ये बोरले पाटील यांच्यासाठी तीन दिवसात मदत जमा करण्याचे ठरविण्यात आले होते, त्यानुसार पोलीस पाटील संघाच्या मलकापूर तालुका ग्रुपसह बुलढाणा जिल्हा ग्रुपवर मदतीची हाक देण्यात आली. बुलढाणा जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी भरभरून प्रतिसाद देऊन ३७,५०० रुपयांची मदत तीन दिवसात जमा केली.
जमा झालेली मदत आज श्रीकृष्ण बोरले पाटील यांच्या गावी तांदुळवाडी येथे जाऊन त्यांच्या सुपूर्द करण्यात आली. यावेळी आर्थिक मदतीसह बुलढाणा जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघाकडून श्रीकृष्ण बोरले पाटील यांना कपडे, रुमाल टोपी, आणि त्यांच्या पत्नी सौ.ममताताई यांना साडीचोळी भेट देण्यात आली. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भामद्रे, राज्य मार्गदर्शक गजाननराव भोपळे, जिल्हा मार्गदर्शक संजय शिंबरे, मार्गदर्शक गजाननराव झनके, जिल्हा सहसचिव योगेश पाटील, जिल्हा संघटक सुरेश पाटील, जिल्हा सदस्य प्रवीण वराडे, मलकापूर उपविभाग प्रमुख श्रीकृष्ण क्षीरसागर, मलकापूर तालुका अध्यक्ष गजानन तायडे, तालुका कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र एरुळकर, राजू वले पाटील घुस्सर, जितेंद्र पाटील धरणगाव, नामदेव पाटील कुंड बुद्रुक, सुनील भवरे शिवनी, श्रीकृष्ण क्षीरसागर विटाळी आदी पोलीस पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!