राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही; अजित पवार आमचेच वरिष्ठ नेते!
– पक्षाचे दोन गट, एक सत्तेत, तर दुसरा विरोधात – खा. सुप्रिया सुळे
पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. अजित पवार हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आमचा पक्ष एकच आहे.’, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी केला. पुण्यामध्ये खा. सुळे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
अजित पवारांसह ९ मंत्री आणि दोन खासदारांना पक्षाने काढून टाकल्याच्या ठरावाचे पत्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे सादर केलेय. त्यामुळे सुप्रिया सुळे राष्ट्रवादी पक्ष फुटलेला नाही म्हणताहेत.#sharadpawar #AjitPawar #supriyasule #NCP pic.twitter.com/EBr07vAw81
— Vidarbha Times (@VidarbhaaTimes) August 24, 2023
खा. सुप्रिया सुळे यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. ‘भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याला थोड्या प्रमाणात यश आले आहे. त्यातील काही जण सरकारमध्ये सहभागी आहेत. अजित पवार हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पक्ष विरोधात भूमिका घेतली असल्याने त्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत’, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, ‘पक्षातील किती आमदार नेमके कुठे आहेत याचे स्पष्ट आकडे आमच्याकडे नाहीत. पण अजूनही अनेकजण आमच्याकडे येतात कधी तिकडे जातात. फक्त नऊजण तिकडे गेले आहेत, बाकी इतर सर्वजण दोन्हीकडे आहेत. छगन भुजबळ यांनी पवारसाहेब यांच्यावर टीका केली नसून, त्यांच्या मनातील भावना बोलून दाखविली आहे.’
तसेच, ‘पवारसाहेब राष्ट्रवादीची स्थापना होण्यापूर्वी चारवेळा मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. विधानसभेला राष्ट्रवादीच्या जागा जास्त आल्या तरी १४४ चा जादुई आकडा नव्हता. तसेच तेव्हा विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय पवारसाहेबांना योग्य वाटला तो निर्णय त्यांनी घेतली.’, असेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, ‘देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाईट वाटत आहे. मेहनत करुन निवडणुकीच्या मैदानात उतरतात, आणि १०५ आमदार निवडून आणतात. तरी ते मुख्यमंत्री न होता दुसर्याला मुख्यमंत्री करतात. त्यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलणार, अशी टीका त्यांनी केली आहे.
——-