उदयनगर (प्रतिनिधी) – वैरागड परिसरासह मोहाडी मंदिर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून अस्वलाचा मुक्त संचार सुरू आहे. परिणामी, नागरिकांच्या धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने त्या अस्वलाला जेरबंद करुन बदोबस्त करावा, अशी मागणी वैरागड येथील सरपंच दीपक तायडे यांनी उपवनसंरक्षक बुलढाणा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात दीपक तायडे यांनी शुक्रवारी, दि.२५ ऑगस्ट रोजी उपवनसंरक्षकांशी चर्चा करून निवेदन दिले. वैरागड परिसरामधील व मोहाडी येथील महादेव म्हसोबा संस्थान मध्ये हिंस्त्र अस्वल गेल्या ४ ते ५ दिवसापासून मुक्त संचार करत आहे. सध्या श्रावण मासानिमित्त सकाळी दर्शनासाठी भाविकांची मोहाडी मंदिरात गर्दी असते, तरी भाविकांमध्ये मुक्त संचार करीत असलेल्या अस्वलाची भीती निर्माण झाली असून, परिसरातील वन विभागाने या अस्वलाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच दीपक तायडे यांनी केली आहे.