Breaking newsCinemaHead linesWomen's WorldWorld update

चतुरस्त्र, सोज्वळ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

– आज सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यविधी

मुंबई (प्राची कुलकर्णी) – हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या सोज्वळ, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी सकाळी वृद्धपकाळ व आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचा मुलगा अजिंक्य देवही प्रसिध्द अभिनेता आहे. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज (दि.२४) संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. देव यांच्या ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या.

सीमा रमेश देव यांचा जन्म २७ मार्च १९४२ मुंबई येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ असे होते. मुंबईतील गिरगावात त्यांचे बालपण गेले. त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला तेव्हा महिलांसाठी अभिनयसृष्टी सोपी नव्हती. पण त्यानंतरही त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा या चंदेरी दुनियेत उमटवला. सीमा देव यांनी शालेय जीवनापासूनच नृत्याची आवड जोपासली. त्या कल्याणजी-आनंदजींपैकी आनंदजींच्या ऑर्वेâस्ट्रात गाणी गात होत्या. सीमा देव यांना २०१७ मध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या ‘मोलकरीण’ या चित्रपटातील ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर’ हे गाणे प्रचंड गाजले. सीमा यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला तेव्हा दुर्गा खोटे, सुलोचना, ललिता पवार या अभिनेत्रींनी महिलांसाठी अभिनय क्षेत्रात वाट दाखवण्यास सुरुवात केली होती. मात्र तरीही सीमा यांच्यासाठी प्रवास सोपा नव्हता. समाजाची बोलणी आणि नजरा यावर मात करत त्या पुढे आल्या. १९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, हे त्यातले काही उल्लेखनीय चित्रपट. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ सिनेमातील त्यांची भूमिका छोटी; परंतु संस्मरणीय आहे. अभिनेते रमेश देव व सीमा देव या पती – पत्नींनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. या दोघांची जोडी मराठी सिनेसृष्टीतली एक सदाबहार जोडी म्हणून ओळखली जात होती.
रमेश देव आणि सीम देव यांनी केवळ अभिनयानेच नाही तर आपल्या प्रेमकहाणीनेही त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले. सीमा देव यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात रमेश देव यांनीदेखील भूमिका साकारली होती. या पहिल्याच चित्रपटापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती. त्यानंतर दोघांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडली. सीमा देव यांनी ‘सरस्वतीचंद्र’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आनंद’, ‘कोशिश’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. १९६२ मध्ये ‘वरदक्षिणा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सीमा आणि रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुले आहेत. त्यापैकी अजिंक्यनेही आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, तर अभिनय हा दिग्दर्शन आणि पटकथा लेखन क्षेत्रात कार्यरत आहे.


गेल्या जवळपास वर्षभर त्या वयोमानानुसार आजारी होत्या. शिवाय, त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलगा अभिनय देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. अभिनयदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. सीमा देव यांच्या निधनाबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, सिनेमासृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!