औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील एका चाळीस वर्षीय महिलेने मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांत तब्बल ५० लग्नाळू तरुणांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावत फसवणूक केली आहे. लग्न होत नसलेल्या मुलांना सुंदर मुलगी दाखवणे, ती पसंत पडली की, मुलाच्या कुटुंबीयांकडून एक ते दहा लाख रुपये घेणे, लग्न झाले की एक-दोन दिवसांत नवरी पैसे, सोने, दागिने घेऊन पसार व्हायची. याबाबत दौलताबाद पोलिसांत दाखल गुन्ह्यावरून या रॅकेटची सूत्रधार महिला जेरबंद करण्यात आली आहे.
या महिलेने ५० पेक्षाअधिक युवकांची फसवणूक केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. मराठवाड्यासह नजीकच्या नगर, सोलापूर, पुणे, नाशिक जिल्ह्यांतही या टोळीने अनेकांना फसवले असल्याचे उघड होत आहे. दौलताबाद पोलिस ठाण्यात ८ एप्रिल रोजी दाखल गुन्ह्यानुसार, मावसाळा येथील युवकाचे २६ मार्च रोजी लग्न लावून दिल्यानंतर चौथ्या दिवशी नवरीने दौलताबाद किल्ला पाहण्याचा बहाणा करुन पळ काढला होता. त्यानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या दौलताबाद पथकाने केलेल्या तपासात या टोळीने ५० हून अधिक युवकांना फसवल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्यावेळी नववधूला सुरुवातीला अटक केली. तिच्या चौकशीत लग्न लावून देण्यार्या टोळीची प्रमुख ही जळगाव जिल्ह्यातील भडगावची आशाबाई प्रकाश बोरसे असल्याचे सांगितले. त्यासोबत तिला लताबाई राजेंद्र पाटील हिने मदत केल्याचे स्पष्ट झाले. ६ जुलै रोजी लताबाई जळगावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दौलताबाद पोलिसांचे पथक जळगावला पोहोचले. त्यांनी लताबाईला ताब्यात घेतले. तिने टोळीची सूत्रधार आशाबाई असल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक भडगावला पोहोचले. पोलिस आल्याचा सुगावा लागताच आशाबाईने पळ काढला. पथक लताबाईला घेऊन दौलताबादला आले आहे. आता तिच्याकडून या फसवणुकीची संपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. अधिक तपास दौलताबाद पोलिस करत आहेत.
—————-
Leave a Reply