मेरा बु , ता. चिखली (प्रताप माेरे) : यावर्षी वादळी वाऱ्यासह दमदार संततधार पाऊस पडत असल्याने गुंजाळा परिसरातील लहान मोठे नदी नाल्यामधून ओव्हरफ्लो पूर वाहत आहे . दररोजच्या पुरामुळे तलावात ओव्हरफ्लो पाणी साठा उपलब्ध झाल्याने भिंती खालच्या शेत जमिनी चिभडण्यास सुरवात झाली तसेच शेतातील पिके पिवळे होण्याच्या मार्गावर दिसत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होवून गेला आहे .
मेरा बु परिसरामध्ये गुंजाळा गावाची जास्तीत जास्त जमीन कोरडवाहू असून खडकाळ स्वरूपाची असल्याने या शिवारात जास्त पाऊस पडल्यास जमिनी चिभडतात तर कमी पाऊस झाल्यास पिके करपू लागतात. त्यामुळे शेतकरी वर्ग दरवर्षी मृगनक्षत्र लागताच घाईगडबडीत शेताची पेरणी करून मोकळे होतात . मात्र यावर्षी उशिरा पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांनी घरात पेरणीसाठी साठवून ठेवलेले खत बी बियाणे घेवून शेताची पेरणी केली. परंतू वादळी वाऱ्यासह ढगफुटी सारखा पाऊस पडल्याने काही शेतातील पेरलेले बियाणे उगलेच नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली . कशी बशी पेरणी केली आणि पिके हिरवेगार दिसायला सुरवात होताच गेल्या पाच दिवसापासून पावसाने संततधार सुरवात करुण जमिनी चिभडविल्या असून, पिके पिवळे होत आहेत. तसेच पिकामध्ये तणाचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांना औषधी फवारणी करणे अवघड होवून गेले आहे .
संततधार व दमदार स्वरूपाचा पाऊस दररोज सुरू असल्याने लहानमोठे नदी नाले, ओव्हरफ्लो पूर वाहत आहे . नदी नाले मधून दररोजच पूर जात असल्याने गुंजाळा येथील एकूण तीनही पाझर तलावामध्ये ९० टक्के पाणी साठा उपलब्ध होवून गेला आहे . त्यामध्ये पाझर तलाव क्र २ चे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने तलावा खालच्या जमिनीत पाणीच पाणी होवून जमिनी चिभडतात आणि शेतात पेरलेले बियाणे व पीक जमिनीतच सडून जातात . या बाबतीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी अनेकवेळा भुसिंचन दे राजा व बुलढाणा यांच्याकडे केली होती मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एकही दमडी मिळाली नाही . त्यामुळे शेतकरी २०१० पासून जमिनीत पेरणी न करता जमिनी पंडित ठेवत आहे . मात्र यावर्षी उशिरा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी शेतीची पेरणी केली आणि अचानक गेल्या पाच दिवसापासून संततधार व दमदार पावसाने हजेरी लावली दररोजच्या पावसामुळे तलावाच्या भिंतीमधून मोठया प्रमाणावर पाणी पाझरून भिंती खालच्या जमिनीत पाणीच पाणी झाले . तसेच शिवारातील पिके पिवळे होण्याच्या मार्गावर आली आहेत शेतकरी वर्ग दरवर्षी पीकविमा बँकेत भारतात मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देवून तोंडाला पाने पुसली जातात . त्यामुळे शासनाने शेतकऱ्याकडून पीकविमा रक्कम वडून न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे .