– सपत्नीक केली महापूजा, शिंदे घराण्याच्या चार पिढ्या महापूजेला
– यंदाच्या शासकीय महापूजेचा मान बीड जिल्ह्यातील रूई गावच्या नवले दाम्पत्याला
पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) – ‘महाराष्ट्रावरचं संकट दूर कर, सर्व अडचणी दूर होऊ दे’, असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजेनंतर आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीहरी विठ्ठलाला घातले. शिंदे यांच्याहस्ते सपत्नीक विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा बरोबर रात्री दोन वाजेच्या मुहुर्तावर करण्यात आली. तर मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचे सदभाग्य यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रूई येथील मुरली भगवान नवले (वय ५२) व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले (वय ४७) या वारकरी दाम्पत्याला लाभले. हे दाम्पत्य गेल्या २० वर्षांपासून पायी वारी करतात. यंदा विठ्ठलाने या आपल्या भक्तांचा यथोचित सन्मान करत, त्यांना शासकीय महापूजेचे आशीर्वाद दिल्याने हे दाम्पत्य आनंदीत झाले होते. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत नवले दाम्पत्य भूवैकुंठ पंढरपुरी आले होते.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लताताई शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाली. पूजा करताना मंदिराचा गाभारा विठुमाउलीच्या जयघोषात दुमदुमून गेला. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली. या महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांच्या चार पिढ्या एकत्र आल्या होत्या. त्यांचे वडील संभाजी शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत आणि नातू रूद्रांश हादेखील पूजेसाठी उपस्थित होता.
पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी टाळ वाजवून हरिनामाचा गजर केला, तर लताताई शिंदे यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. आजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा, महत्वाचा दिवस आहे. पांडुरंगाची कृपा, आई-वडिलांची पुण्याई यांच्यामुळे आज महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्यावतीने आपल्याला साक्षात पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली.
—————