– संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल
– मुख्यमंत्र्यांच्याहस्ते रविवारी पहाटे शासकीय महापूजा
पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) – आषाढी एकादशीनिमित्त भूवैकुंठ नगरी सजली असून, श्री विठ्ठल व रुख्मिणी मातेच्या मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रविवारी, भल्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सपत्नीक महापूजा केली जाणार असून, पंढरपूरनगरीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असून, भाविकांना दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकरी बांधवांची गर्दी उसळली असून, तब्बल दोन वर्षानंतर वारकरी बांधव वैकुंठाच्या भूमीवर आल्याने त्यांचा आनंद अवर्णनीय आहे. अंदाजे दहा लाखापेक्षा जास्त वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत.
पोलिस, एनडीआरएफ यांची पथके चंद्रभागेच्या तिरावर तैनात करण्यात आली आहेत. ते चोवीस तास गस्त घालत आहेत. आळंदी, देहूसह राज्यभरातून वारकरी पंढरपुरात दाखल होत असून, चंद्रभागेतील स्नानानंतर नामदेव पायरीचे दर्शन घेत आहेत. दरम्यान, आचारसंहितेमुळे पंढरपुरात आषाढीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, निवडणूक आयोगाने महापूजेला सशर्त परवानगी दिल्याने, हा संभ्रम दूर झाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा होणार आहे.
आज सर्व संतांना पुढे करून सर्वात शेवटी दुपारी एक वाजेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होत पंढरपुरात विसावली. विसावा पादुका येथे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची भेट झाली व तेथेच शेवटचे उभे रिंगण पार पडले. त्यानंतर संतांची आरती झाली. माऊलींच्या पादुका श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात देण्यात आल्या, त्या त्यांनी पंढरपुरातील ज्ञानेश्वर मंदिरात नेल्यात. या वारीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत तब्बल १० लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेले आहेत.
————