बुलढाणा (प्रशांत खंडारे) – जिल्ह्यातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबीडची ओळख आहे. परंतु १० वर्षापासुन सदर कारखाना बंद स्थितीत होता. सदर कारखाना बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या प्रयत्नाने लवकरच सुरु होत आहे. नविन संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून कारखान्याचा अधिकृत ताबादेखील घेतला आहे.
या साखर कारखान्यामुळे परिसरात हरीतक्रांती झाली होती, परंतु काही कारणास्तव सदर कारखाना १० वर्षापासुन बंद पडला होता. त्यासाठी शासन स्तरावरुनही प्रयत्न झाले होते परंतु यश आले नव्हते. तेव्हा बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष यांनी गेल्या ३ वर्षापासुन कारखाना पुन्हा सुरु व्हावा यासाठी प्रयत्न केले, त्याला आता यश आले आहे. व्यंकटेश शुगर इंडस्ट्री लि. यांना सदर कारखाना विकत घेण्यासाठी बुलडाणा अर्बनने पुढाकार घेवून ३० कोटी रु. कर्ज उपलब्ध करुन दिले असुन सदर कर्ज कारखान्याचे जिजामाता सहकारी साखर कारखाना हे नाव न बदलण्याच्या अटीवर उपलब्ध करुन दिले आहे. आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी सदर कारखान्याची खरेदी झालेली असुन येत्या काही दिवसात सदर कारखाना पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे.
आता तीन सहकारी साखर कारखाने !
यापुर्वी बुलढाणा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखाने बुलडाणा अर्बनच्या पुढाकाराने सुरु करण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे धाड (वरुड) येथील अनुराधा सहकारी साखर कारखाना व मेहकर येथील महेश शुगर हे दोन कारखाने बंदस्थितीत होते, परंतु बुलडाणा अर्बननेच पुढाकार घेवुन सदर कारखाने सुरु केले असुन ते चांगल्या प्रकारे चालु आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आता तिन सहकारी साखर कारखाने असुन शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी त्यामुळे जिल्ह्यात हरितक्रांती घडून येईल व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल असा विश्वास श्री. राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केला आहे.