बुलढाणा (प्रशांत खंडारे) – भारताने अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून ही मोहिम फत्ते व्हावी यासाठी बुलडाण्यात रूद्र ढोल ताशाच्या पथकाकडून तत्पूर्वी अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या, या रूद्र ढोल ताशा पथकाने ढोल साहित्याच्या माध्यमातून चंद्रयान-3 ची प्रतिकृती साकारली होती. दरम्यान, मोहिमेच्या यशस्वीतेसाठी चंद्रयान- 3 सफल रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. ही मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचे सोने झाले आहे.
चांद्रयान 2 मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेले अपयश सदर चांद्रयान 3 च्या माध्यमातून पुसून काढण्यात आले आहे. भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे आणि ही मोहिम यशस्वी होईल यासाठी बुलडाणेकरांच्या देखील भरभरून शुभेच्छा होत्या.
बुलढाण्याचा महत्वपूर्ण वाटा ..
देशासाठी महत्त्वकांक्षी आणि अभिमानास्पद असलेलं चांद्रयान – 3 या मोहिमेत बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दोन वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. खामगाव येथील प्रसिद्ध असलेली चांदी आणि प्रसिद्ध असलेले थर्मल फॅब्रिक्स यांचा चांद्रयान 3 मोहिमेत वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता खामगावसह राज्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
https://breakingmaharashtra.in/sucsessful_landing/