बुलढाणा/मेहकर (अनिल मंजुळकर) – कोरोना काळात अजोड कार्य करणारे मेहनती सनदी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची बुलढाण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने बुलढाण्याला कष्टाळू जिल्हाधिकारी लाभला आहे. दरम्यान, डॉ. तुम्मोड यांच्या अचानक व तडकाफडकी बदलीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अवघ्या दहाच महिन्यांत त्यांची येथून बदली झाली आहे.
डॉ. किरण पाटील यांनी यापूर्वी मंत्रालयामध्ये मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून कामकाज पाहिलेले आहे. कोरोना काळात तर रात्रंदिवस त्यांनी काम केल्याने एक कष्टाळू अधिकारी म्हणून त्यांचा परिचय आहे. दरम्यान, केवळ दहा महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले डॉक्टर एच. पी. तुम्मोड यांची अचानक बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डॉक्टर तुम्मोड यांची मुंबई विकास आयुक्त असंघटित कामगार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.