तेलंगणातील विकासकामांची जिल्ह्यातील सरपंचांना भुरळ?
– जिल्ह्यात ‘बीआरएस’ पसरतेय हातपाय!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील तब्बल ७० सरपंच तेलंगणासाठी २० ऑगस्टरोजी रवाना झाले असून, मुख्यमंत्री केसीआर अर्थात के चंद्रशेखर राव यांची २१ ऑगस्टरोजी त्यांनी भेट घेतली. काल, २२ ऑगस्ट रोजी त्यांनी विविध विकासकामांची पाहणीदेखील केली. दरम्यान, या माध्यमातून तेलंगणातील बीआरएसने बुलढाणा जिल्ह्यातही हातपाय पसरायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेसह इतरही निवड़णुका जवळ येवून ठेपल्या आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिंदे गट, वंचित बहुजन आघाड़ी यासह सर्वच पक्ष निवड़णकीच्या तयारीला लागले आहेत. विकास कामाच्या भरवशावर तेलंगाणा राज्यात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस सत्तेत टिकून आहे. ‘अबकी बार किसान सरकार’ हे ब्रीद घेऊन मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रातही कामाला सुरूवात केली असून, बुलढाणा जिल्ह्यातही पक्षांची पाळेमुळे रोवायला सुरूवात केली आहे. गाव विकासासाठी सरपंच हा महत्त्वाचा घटक असल्याने मुख्यमंत्री केसीआर यांनी जिल्ह्यातील सरपंचाना हेरून तेलंगाणातील विविध विकासाची कामे दाखवायला सुरूवात केली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील २० सरपंचासह इतर पदाधिकारी तेलंगाणाचा दौरा करून आले. तर २० ऑगस्टरोजीसुध्दा जिल्ह्यातील जवळपास ७० सरपंच तेलंगणा येथे ट्रॅव्हल्सने गेले असल्याची माहिती असून, २१ ऑगस्टरोजी त्यांनी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची हैद्राबाद येथे भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र प्रभारी श्री. के.वमशिधर, पी.साईनाथ उपस्थित होते. २२ ऑगस्ट रोजी या सरपंचांनी विविध विकासकामांची पाहणीदेखील केली. विशेष म्हणजे, सरपंच मंड़ळींची केसीआर
शासनाकड़ून चोख व्यवस्थादेखील केली जात आहे. तर जिल्ह्यातील सरपंचांची जबाबदारी काँग्रेसमधून नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केलेले सरपंच रविंद्र ड़ाळीमकर यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे. बीआरएसकड़ून पक्ष कार्यकर्त्यांचा दोन लाखांचा अपघात विमादेखील काढला जात आहे. जिल्ह्यातील सरपंचासह विविध पदाधिकारी यांना तेलंगणा फिरवून आणत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र राज्यासह जिल्ह्यातही हातपाय पसरायला सुरूवात केल्याचे दिसत आहे. बीआरएसची तळमळ पाहता, आगामी निवड़णुकीत त्याचा निश्चितच परिणाम दिसून येईल, अशी राजकीय चर्चा आहे.
—-