इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज!; सायंकाळी ६:०४ ला चांद्रयान-३चे चंद्रावर होणार लॅण्डिंग!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’ची भारतासाठी असलेली गौरवशाली ऐतिहासिक मोहीम, चांद्रयान-३ इतिहास रचण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हे चांद्रयान यशस्वीपणे उतरल्यावर, चंद्रावर यान पाठवणारा भारत जगातला चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅण्डिंग करणारा पहिला देश ठरणार आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला भारताचे हे यान चंद्रावर लॅण्ड होणार आहे. दरम्यान, या लॅण्डिंगचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. हे लॅण्डिंग यशस्वी होण्यासाठी देशभरातील मंदिरे, चर्च, मशिदींमध्ये विशेष प्रार्थना, पूर्जा-अर्चा केली जात आहे. यानिमित्ताने देशवासीयांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे.
हर हर महादेव!
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी, उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती दरम्यान विशेष प्रार्थना करण्यात आली. pic.twitter.com/QsbLD6AWVV
— The Pawan Updates (@ThePawanUpdates) August 23, 2023
भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवशाली असलेला चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्याचा क्षण आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचे काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झाले असून, लॅण्डर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झाली आहे. या क्षणाला चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या १५ मैलावर असून, लॅण्डिंगची तयारी पूर्ण झाली आहे. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचे सॉफ्ट लॅण्डिंग होईल. २०१९ मधील चांद्रयान-२चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोने चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली. विक्रम लॅण्डरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लॅण्डर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील. चांद्रयान-३च्या लॅण्डिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल, आणि लॅण्डिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लॅण्डिंग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकते, अशी माहिती ‘इस्रो’ने दिली आहे.
चांद्रयान-३ मिशन: चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचे नयनरम्य दृश्य..#Chandrayaan_3 #Chandrayaan3 #isro #india #moon #MissionMoon pic.twitter.com/hvctUNGSup
— Shrikant Tara Pandit Bharatiya (@ShreeBharatiya) August 21, 2023