बुलढाणा (संजय निकाळजे) – पंढरपूर यात्रेदरम्यान बसमध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी लाच मागणार्या बुलडाणा आगार व्यवस्थापक संतोष वानेरे व वाहक महादेव दगडू सावरकर या दोघांना सात हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सविस्तर असे, की पंढरपूर यात्रे दरम्यान बसमध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी बुलढाणा आगार प्रमुख संतोष महादेव वानेरे वय (५०) वर्ष यांनी व्हिडिओ वरून कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी तक्रारदाराला ४० हजार रुपयाची लाच मागितली होती. मात्र ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार प्रदीप सरकटे यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीला दिली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. बुलढाणा आगारात त्यांचे मावस भाऊ महादेव सावरकर यांच्या मार्फत २८ हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारले आणि उर्वरित ७ हजार रुपयाची लाच स्वीकारताना २१ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री शहरातील खामगाव रोडवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले आहे.
आरोपींविरोधात पोलीस स्टेशन बुलडाणा शहर येथे अप नं. ७३४ / २०२३ कलम ७(अ), १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास घेवरे पोलीस उपअधीक्षक, श्रीमती शितल घोगरे, पो.नि. सचिन इंगळे, पोहेकॉ मोहम्मद रिजवान, राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी, ना. पो. शि. विनोद लोखंडे, जगदीश पवार, रवींद्र दळवी, सुनील राऊत पोकॉ. गजानन गाल्डे, मपोकॉ स्वाती वाणी, चापोका शेख अरशद बुलडाणा यांनी पार पाडली. काल, २२ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपींना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.