– एका ‘संजया’ची दुसर्या ‘संजया’वर मात?
मेहकर (अनिल मंजुळकर) – ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर बुलढाण्यातच घेण्याचे राज्य सरकारने निश्चित केले असून, मेहकरला डावलले गेले आहे. राजकीयदृष्टीने पाहाता शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांच्यावर याच गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यशस्वी मात केली आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा येथे मंगळवार, दि. २९ ऑगस्टरोजी करण्यात येणार असून, यात शासकीय योजनांच्या लाभासह रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी बी. एम. मोहन आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती विसुपते म्हणाल्या, शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणणे हा महत्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने वाहतूक आराखडा तयार करावा. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या दिवशी आणताना त्यांची काळजी घेण्यात यावी. बसमध्ये प्राथमिक उपचारासोबतच आरोग्य सेवक, एक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. कार्यक्रमासाठी येणार्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने कार्यक्रमस्थळी आरोग्य सुविधा उभारण्यात यावी. तसेच फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी. शौचालयाअभावी प्रामुख्याने महिलांची गैरसोय होऊ नये. कार्यक्रमाला येणार्या लाभार्थ्यांना रोपे आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरेकेटींग आणि आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. शहरात मेडीकल असोसिएशन चांगले कार्य आहे. त्यांनाही यात सामावून घ्यावे, तसेच कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपले नियोजन करावे, असे आवाहन श्रीमती विसपुते यांनी केले.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस हे बुलढाण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम मेहकर येथे घेण्यासाठी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी पुढाकार घेतला होता. परंतु, त्यांनी दलित समाजातील ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिवीगाळ व धमकी देण्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली, आणि राज्यभर दलित समाजात संतापाची लाट उसळली. तसेच, या कार्यक्रमाला गालबोटही लागण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारने हा कार्यक्रम मेहकरऐवजी बुलढाण्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राजकीय सूत्राने दिली आहे. तसेच, हा कार्यक्रम बुलढाण्यात घेण्यासाठी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हेदेखील प्रयत्न करतच होते. त्यांच्याही प्रयत्नाला अखेर यश आले आहे.
—-