– मुंबई येथे घेतली आढावा बैठक : लोकसभा, विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी रणनीतीची आखणी!
बुलढाणा/मुंबई (जिल्हा प्रतिनिधी) – महाविकास आघाडीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे. प्रतापराव जाधवांना धडा शिकविण्यासाठी कामाला लागा, असे आदेश शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना दिलेत. मुंबईत मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत बुलढाण्याची जागा जिंकण्यासाठी रणनीती आखून ही जागा आपण जिंकूच, असा विश्वासही ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेचा तिढा सुटल्यात जमा असून, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर आणि शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या सरळ लढत होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. तर या दोघांच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मैदानात उतरणार असल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत निश्चित मानली जात आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुलढाण्यातील पदाधिकारी व ज्येष्ठ शिवसैनिकांची मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत मिशन लोकसभा यशस्वी करण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना जोरदारपणे पाडा, असे सांगून जाधव यांना आगामी निवडणुकीत नुसतेच पाडायचे नाही तर आपला बालेकिल्लादेखील शाबुत ठेवायचा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची रणनीतीच त्यांनी शिवसैनिकांना सांगितली. इंडिया आघाडीमध्ये बुलढाणा हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे (ठाकरे) असून, ही जागा आपणच लढणार आहोत, असे आश्वासन देत त्यांनी यावेळी संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या प्रतापराव जाधवांचा पराभव करण्यासाठी आपला उमेदवार निवडून आणा, असे आदेशही ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांना यावेळी दिलेत.
भाजपच्या जागा पाडण्याचे शिवसैनिकांना आदेश!
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद आणखी वाढवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश देत, विधानसभा मतदारसंघातदेखील जिथे भाजपचा उमेदवार उभा राहील, तेथे त्यांचा पराभव करण्याची रणनीती आतापासूनच तयार करा, आणि तयारीला लागा, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैना पदाधिकार्यांना दिल्या. त्यामुळे नजीकच्या काळात शिवसैनिक हे भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी कंबर कसणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
—-