BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

मेहकरातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम गुंडाळला?

– मुख्यमंत्री येणार म्हणून मेहकरात विकासकामे जोरात; खंडाळाजवळील क्रीडा संकुलाचीही जोरदार साफसफाई!

मेहकर (अनिल मंजुळकर) – सरकारी योजनांचा जागर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेहकरमध्ये येणार असले, तरी त्यासाठीचा एकेक मुहूर्त पुढे-पुढेच जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत ‘तारीख पे तारीख’चा प्रत्यय जिल्हावासीयांना येत असून, मेहकरातील 29 तारखेचा कार्यक्रमही पुढे ढकलला गेल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम मेहकर येथे जल्लोषात होणार म्हणून शासकीय अधिकारी, कर्मचारी हे कामाला लागले आहेत. नगरपालिकेचे प्रवेशद्वार, शहरातील रस्ते, अतिक्रमणे व खंडाळाजवळ असणार्‍या क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्यदिव्य मंडप उभारण्यात येणार म्हणून साफसफाई केली गेली. परंतु, २९ तारखेचासुध्दा कार्यक्रम रद्द झाल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या कानावर आली आहे. विशेष म्हणजे, मंडप उभारण्याचे काम करणारा ठेकेदारदेखील आपले सामान ट्रकमधून भरून निघाला असल्याचे दिसून आले.

राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना थेट देण्यासाठी राज्यातील शिंदे-पवार-फडणवीस सरकारचा महत्वांकांक्षी कार्यक्रम असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम मेहकर येथे ११ ऑगस्टला होणार होता. परंतु, तो अचानक पुढे ढकलला गेला. नंतर तो १७, २०, २४ तारखेनंतर आता २९ तारखेला होणार म्हणून शासकीय अधिकारी कामाला लागले होते. खंडाळा परिसरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात ८ ऑगस्टपासून भव्य मंडप उभारणीचे काम सुरू होते. जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे, तहसीलदार, महसूल उपविभागीय अधिकारी, व इतर अधिकार्‍यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. कार्यक्रमाच्या तारखा सतत बदलत असल्यामुळे अधिकारीवर्ग व कर्मचारीसुध्दा वैतागून गेले आहेत. शेगाववरुन मेहकरला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी खेचून आणला होता. परंतु सतत तारखा बदलत असल्यामुळे नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार आता वैतागून गेले आहेत. मेहकरात होणारा हा कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती आली आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे, मंडप उभा करणारा ठेकेदारही आपले सामान घेऊन जाताना आज दिसून आला.


मेहकरातून मंडप ठेकेदाराने उचलले साहित्य!

चार दिवसांच्या बोलीवर मंडप उभारणीचे साहित्य या कार्यक्रमासाठी ठेकेदारामार्फत आणण्यात आले होते. चाळीसगाव व इंदोरवरून आणले गेलेले हे साहित्य गेल्या १२ दिवसांपासून पडून होते. आता या कार्यक्रमाबाबत काहीच निश्चितता नसल्याने मेहकरातील कंत्राटदाराने क्रेनच्या सहाय्याने हे सामान व साहित्य ट्रकमध्ये भरून हलविणे चालविले असल्याचे दिसून आले आहे.


कार्यक्रम रद्द झाला, की पुढे ढकलला?

मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांची दलित समाजातील ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिविगाळ व धमकीची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर या मतदारसंघातील दलित समाज कमालाचा संतप्त झालेला आहे. तसेच, सर्वपक्षीय नेत्यांनीदेखील या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे मेहकरमध्ये येण्यास टाळत असल्याची खात्रीशीर माहितीही कानावर आली आहे. त्यामुळे मेहकरात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम रद्द केला गेला, की पुढे ढकलला? याबाबत प्रशासकीय स्तरावरून अधिकृतपणे काहीही माहिती मिळत नाही. या संदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यास विचारणा केली असता, अद्याप काहीही निश्चित दिसत नसल्याचे त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. शासनस्तरावरून याबाबत निश्चित तारीख अद्याप आलेली नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. दरम्यान, हा कार्यक्रम मेहकरएवजी बुलढाणा येथे घेतला जाण्याची शक्यताही काहींनी व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!