बुलढाणा (प्रशांत खंडारे) – शहरासह जिल्ह्यातील भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. नगर परिषदेतर्फे लाखो रुपयांचा निधी श्वान निर्बीजीकरणासाठी खर्च होत असूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसते. जिल्ह्यात श्वानांनी यावर्षी जून ते २१ ऑगस्टदरम्यान तब्बल १२८९ जणांना दंश केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात व शहरात सध्या भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. भररस्त्यात भटक्या श्वानांचा घोळका मुक्त संचार करत असतो. नागरिकांमध्ये त्यांची दहशत माजली आहे.
नगरपालिका एकीकडे म्हणते आहे की, श्वान निर्बीजीकरणासाठी अनेक योजना राबवत आहोत. या योजनेपोटी लाखो खर्चही झालेले आहेत, परंतु नागरिक म्हणतात की वर्षभरात श्वान पकडणारे एकही वाहन दिसलेले नाही. त्यामुळेच श्वानांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. चौका- चौकात रस्त्यावर सर्वाधिक श्वान दिसून येतात. कधीकधी एकट्या दुकट्या नागरिकांच्या मागे हे श्वान लागतात. त्यांच्यावर ओरडून त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते नागरिकांना चावे घेतात. दररोज रुग्णालयात श्वानदंशाचे ५-६ रुग्ण दाखल होताना दिसतात. लहान मुले आणि वृद्धांवर श्वान मोठय़ा प्रमाणात हल्ले करत असल्याचे दिसते. परंतु या संदर्भात नगरपालिका गंभीर दिसत नाहीत, असा आरोप होत आहे.
कुत्रा चावल्यास त्वरित लस घ्यावी!
कुत्र्यांनी चावा घेतल्यास त्यांनी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. मोकाट कुत्र्यांवर आळा घालणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. सध्या कुत्र्यांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. ही बाब घातक आहे. नागरिकांनीही योग्य ती काळजी घेत कुत्रा चावल्यास त्वरित प्रतिबंध लस टोचून घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.