Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

मुकूल वासनिक, अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या सर्वोच्च ‘वर्किंग कमिटी’त वर्णी!

– वेगवेगळ्या समित्यांत चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, रजनी पटेल यांनाही मिळाली संधी!

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (सीडब्लूसी) कार्यकारिणीचे पुनर्गठण केले. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून मुकूल वासनिक व अशोकराव चव्हाण यांची वर्णी लागली आहे. एकूण ३९ सदस्यीय या पक्षाच्या महत्वपूर्ण कमिटीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्याक्षा सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी – वढेरा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (वय ९०) यांना कायम ठेवण्यात आले आहे. तसेच, आगामी लोकसभा व काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पाहाता, संबंधित राज्यांतील नेत्यांचीही वर्णी या कमिटीत लागली आहे. मध्यप्रदेशातून दिग्विजय सिंह, कमलेश्वर पटेल, छत्तीसगडमधून ताम्रध्वज साहू, आणि राजस्थानमधून सचिन पायलट यांना या कमिटीत संधी मिळालेली आहे. या तीन राज्यांत याच वर्षी तर महाराष्ट्रात पुढील वर्षी निवडणुका आहेत. अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीत एकूण ८४ नेत्यांचा समावेश असून, त्यात वर्किंग कमिटी, स्थायी, आमंत्रित, महासचिव, विशेष आमंत्रित आणि प्रभारी अशा पदांवरील नेत्यांचा समावेश आहे. स्थायी आमंत्रितमध्ये महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे, प्रभारीमध्ये माणिकराव ठाकरे, रजनी पटेल, विशेष आमंत्रितमध्ये आ. यशोमती ठाकूर, आ. प्रणिती शिंदे यांना संधी मिळाली आहे.

मागीलवर्षी नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी २३ सदस्यीय ‘वर्किंग कमिटी’ बरखास्त केली होती, व तात्पुरत्या स्वरूपात ४७ सदस्यीय संचलन कमिटी तयार केली होती. काँग्रेस पक्षात ‘वर्किंग कमिटी’ ही सर्वोच्च असते. पक्षाचे सर्व महत्वपूर्ण निर्णय हीच कमिटी घेत असते. या कमिटीची स्थापना डिसेंबर १९२० मध्ये नागपूर अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष सी. विजयराघवाचार्य यांनी केली होती. पक्षाचे संविधान व नियमांची फेरतपासणी व बदल करण्याचे अधिकारही याच कमिटीकडे असतात. तसेच, पक्षाच्या अध्यक्षाला पदावरून दूर करण्याचे अधिकारही याच कमिटीकडे असतात. आता नव्या कमिटीच्या नेतृत्वात आगामी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका लढविल्या जाणार आहेत.


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी या समितीत अनेकांचा समावेश करून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वगळलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री नितीन राऊत यांच्या नावाचाही समावेश आहे. राऊत यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आल्यानंतर राजकारणात तर्क वितर्क सुरु झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!