BULDHANAHead linesVidharbhaWorld update

सर्प रक्षणाला शासनाचा कोलदांडा!

– मेरे नागराजा तू आना,भाग जाना.. तेरा मेरा है दुश्मन जमाना!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – साप म्हणजे सरपटत येणारा मृत्यू! हे समाजमनात पक्क बसलेलं भयप्रद समीकरण आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि समाजातील गैरसमजामुळे ‘मेरे नागराजा तू आना, भाग जाना.. तेरा मेरा है दुश्मन जमाना!’ असे म्हणण्याची वेळ सर्पमित्रांवर आली आहे. या भीतीला दूर सारून आजची तरुणाई सर्पमित्र म्हणून तळमळीने सर्पसंवर्धनाची मोहीम राबविताना दिसते. साप पकडताना आयुष्याची संध्याकाळ केव्हा होईल याची शाश्वती नाही. आज नागपंचमीला पूजनाने सापांप्रती कृतज्ञता व्यक्त होणार आहे, मात्र, जीव धोक्यात टाकून सर्पसंवर्धन करणार्‍या सर्पमित्रांच्या आयुष्यात फरपटच सुरू असून, त्यांच्यासाठी ‘सन्मानाचा दिवस कधी उजाडेल ?’ याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

घरात, बागेत, सोसायटीत अचानक आलेल्या सापाला आधी रहिवासी मारून टाकायचे त्यालाजाळायचे. गेल्या काही वर्षांत वन्यजीवांसाठी तळमळीने काम करणार्‍या सर्पमित्रांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. ‘सापाला मारण्याऐवजीआम्हाला फोन करा’, ‘आम्ही सापाला सुरक्षित पकडून जंगलात सोडून देतो’ असे सांगून जनजागृतीचे कार्य सुरू केले. गेल्या काही वर्षांत सर्प शोधला जातो.सर्पमित्रांना मित्रांकडून सापांना वाचवण्याची चळवळ हळूहळू वाढत गेली. आणि कानाकोपर्‍यात सर्पमित्रांचे जाळे तयार होत गेले. आजघडीला कुठेही विषारी- बिनविषारी साप आढळून आला की, सर्पमित्रांचा फोन नंबर शोधला जातो. सर्पमित्रांना घटनास्थळी पाचारण करून सुटकेचा निश्वास टाकला जातो. साप वन्यजीव प्रकारात मोडत असला तरी प्रत्येक ठिकाणी वन विभागाला पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे वनाधिकारी बहुतांशी सर्पमित्रांवर अवलंबून असतात.बुलडाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाळ स्थानिक विदर्भ कोकण बँकेत कर्मचारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेची मुहूर्तमेढ रोवत सर्पसंवर्धन चळवळ सुरू केली. गेल्या अनेक वर्षांत रसाळ यांनी शंभरावून अधिक सर्पमित्रांची फळी निर्माण करून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर हजारो सापांना जीवदान देण्याचे कार्य अबाधित ठेवले आहे. मात्र सर्पमित्रांकडे शासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

स्वयंघोषितांची ‘विषारी’ स्टंटबाजी

अप्रशिक्षित व स्वयंघोषित सर्पमित्र ‘विषारी’ स्टंटबाजी करीत असल्याचे भयंकर चित्र आहे. कुठलेही प्रशिक्षण न घेता सापांशी आणि स्वतःच्या जीवाशी देखील खेळ करताना तरुण दिसून येतात. अनेकांनी स्टंटबाजीत प्राण गमावले आहे. स्टंटबाजी करून फोटो माध्यमांवर व्हायरल करण्याची क्रेझ वाढत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी साप पकडल्याची नोंद वनविभागात होत होती. आता वन विभागाने नोंद घेणे बंद केले आहे. त्यामुळे कोण कुठे साप पकडते? कुठे सोडते? सर्व राम भरोसे सुरू आहे. स्टेटबाजी करणार्‍या घोषित सर्पमित्रावर वनविभागाने कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

काय आहे अपेक्षित ?
शासनाने सर्पमित्रांना ओळखपत्र द्यावे. सर्पमित्रांचा विमा उतरवावा. सर्पमित्रांना आवश्यक ती किट देण्यात यावी, सर्प पकडल्यावर वनविभागाने त्यांना साप ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. दोन ते तीन महिन्यात प्रशासकीय यंत्रणेने सर्पमित्रांची बैठक घेण्यात यावी. काही सर्पमित्र नोकरी करून सर्प रक्षण करतात. तरी प्रत्येक सर्पमित्राला मानधन देण्याची तरतूद करण्यात यावी. अशी अपेक्षा सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे.

सापांच्या प्रतिमेचे पूजन करा!
नाग, साप दूध पितो हा समाजात गैरसमज आहे, त्यामुळे नागरिकांनी नागपंचमीनिमित्त सापांना दूध देऊ नये. नागाच्या प्रतिमेचे पूजन करावे, असे आवाहन वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेतर्फे करण्यात आले आहे. साप हा वन्यप्राणी असून त्याचे मुख्य अन्न उंदीर, बेडूक आहे. तो दूध पीत नाही. पण लोकांची फसवणूक करण्यासाठी गारूडी सापांना पकडून, त्यांचे दात काढतात, तोंड शिवतात आणि जबरदस्तीने दूध पिण्यास लावतात. वन्यप्राणी संवर्धन कायदा १९७२ अंतर्गत हा गुन्हा आहे.


सन २००९ रोजी वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून वन्यप्राणी व वन्यजीवांच्या संरक्षणाचे कार्य अविरत सुरू आहे. सर्वसंवर्धनासाठी लोक जागृती आवश्यक असून ती करण्यात येत आहे. सध्या जवळपास ९८ टक्के लोक साप मारत नाहीत. साप पकडणे जोखमीचे काम असून, शासनाने सर्पमित्राच्या अपेक्षित मागण्या पूर्ण करणे गरजेचे आहे.
श्रीराम रसाळ, अध्यक्ष वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्था, बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!