आ. संजय रायमुलकरांचा सत्तेचा माज दलित जनता आता निवडणुकीत उतरवेल!
– खोटंनाटं पत्र लिहून आ. संजय रायमुलकरांकडून जनतेची दिशाभूल; केदारांना संशय!
– आत्मसन्मान व स्वाभिमान जागा ठेवण्याचे आंबेडकरी जनतेला साबरा गावातून आवाहन
मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर हे जे खोटंनाटं पत्र दलित समाजातील ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे यांच्यावर थोपविण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांनीच लिहिले असावे, अशी शंका व्यक्त करत, खोटंनाटं पत्र लिहून जनतेची दिशाभूल करणार्या या आमदाराचा सत्तेचा माज दलित-आंबेडकरी जनता पुढील निवडणुकीत उतरवेल, असा सज्जड दम ऑल इंडिया पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दलित नेते दीपकभाई केदार यांनी आ. रायमुलकरांच्या मेहकर मतदारसंघात जाऊन त्यांना भरला. आ. रायमुलकर यांनी दलित समाजातील साबरा ग्रामपंचायतीचे सदस्य गजानन वानखेडे यांना अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ दलित नेते दीपकभाई केदार यांनी मेहकरमध्ये येत, आ. रायमुलकरांना जाहीरपणे दम तर भरलाच, पण वानखेडे कुटुंबीयांची साबरागावी जात भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. संपूर्ण आंबेडकरी समाज आपल्या पाठीशी आहे. आ. रायमुलकरांना आगामी निवडणुकीत हा तमाम आंबेडकरी समाज धडा शिकवेल, असेही केदार यांनी याप्रसंगी ठणकावले.
पँथर नेते दीपकभाई केदार यांनी आ. रायमुलकरांच्या मेहकर मतदारसंघात जाऊन रायमुलकरांना आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याची भाषा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मेहकरात दाखल होताच त्यांनी मोटारसायकल रॅलीने वाटिकेत जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने युवकवर्ग उपस्थित होता. त्यानंतर मेहकरातून साबरा या गावी जात त्यांनी पीडित वानखेडे कुटुंबीयांना भेट दिली. या भेटीदरम्यान आ. रायमुलकरांचा दीपकभाई केदार यांनी खरपूस समाचार घेतला. गजानन वानखेडे हे शिवसैनिक आहेत, आणि त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी आमदाराने दिली. असे आमदाराचे बोलणे योग्य आहे का? गजानन वानखेडेची चूक काय तर फक्त मेहकर येथे होणार्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची पास त्यांनी आमदारांना मागितली. त्या अश्लील शिवीगाळची ऑडिओ क्लिप वायरल झाल्यामुळे मेहकर मतदारसंघात नाराजीचा सूर उमटला आहे. येणार्या निवडणुकीत मेहकरात आ. रायमुलकर यांना त्यांची जागा दाखवून देऊ, व सत्तेची मस्ती लवकरच उतरेल, असा सज्जड दमसुध्दा भाषणादरम्यान केदार यांनी भरला. पोलिसांनीसुध्दा कार्यकर्त्यांना सीआरपीसीचे कलम १४९ प्रमाणे नोटिसा बजावल्या. संवैधानिक अधिकार असतांनादेखील पीडित गजानन वानखेडे यांची भेट होऊ नये म्हणून सत्ताधारी सरकारची दडपशाही ही घोडचूक असल्याचे दीपकभाई केदार यांनी आपल्या भाषणात सांगितले. आत्मसन्मान व स्वाभिमान जागा ठेवा, असे आवाहनही त्यांनी आंबेडकरी जनतेला केले.
या कार्यक्रमासाठी संघटनेचे राज्य प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे, जिल्हाध्यक्ष अमित काकडे, जिल्हा महासचिव भागवत साळवे, जिल्हा प्रवक्ते संकेत जाधव, मेहकर तालुका अध्यक्ष पंकज वाघ इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने दलित समाज उपस्थित होता. मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी मेहकर व साबरा येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
महाविकास आघाडीकडूनही आ. रायमुलकरांचा आज निषेध!
दरम्यान, साबरा ग्रामपंचायतीचे सदस्य गजानन वानखेडे यांना अश्लील शिवीगाळ व धमकीप्रकरणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर दलित समाजात संतापाची लाट असतानाच, आता महाविकास आघाडी व समविचारी संघटना, पक्षांनीदेखील आ. रायमुलकर यांचा निषेध नोंदविला आहे. आज (दि.१८) रोजी मेहकरात दुपारी बारा वाजता निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे ही निषेध सभा होणार आहे.