बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात कोतवालाच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, कोतवालांच्या पदासाठीची १७ ऑगस्टरोजी काढण्यात येणारी प्रवर्गनिहाय आरक्षण सोड़त पुढे ढकलण्यात आली आहे. मेहकर तालुक्यातही २५ जागा रिक्त आहेत, अशी माहिती तहसीलदार नीलेश मड़के यांनी दिली.
कोतवाल हा गावकरी व तलाठी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम पाहतो. तलाठी नेहमी बदलत असला तरी कोतवाल त्याच गावचा रहिवासी असल्याने त्याला गावातील खड़ा न् खड़ा माहिती असते. त्यामुळे तलाठ्याला काम करणे सोयीचे जाते. पर्यायाने तक्रारीही कमी होतात. त्यामुळे कोतवालाची नितांत गरज आहे. बरेच वर्षापासून कोतवालाच्या जागा रिक्त आहेत. आता शासनाने एकूण रिक्त पदाच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास मंजूरी दिली आहे. खामगाव तालुक्यात २२ जागा रिक्त असून, संग्रामपूर तालुक्यातही ११ पदे रिक्त आहेत. तसेच इतरही तालुक्यात बरीच पदे रिक्त आहेत. एकट्या मेहकर तालुक्यात २५ साज्यातील २५ जागा रिक्त असून, ८० टक्के म्हणजे २० जागा भरण्यात येणार आहेत.
मेहकर तालुक्यातील कोतवाल पदासाठीची प्रवर्गनिहाय आरक्षण सोड़त १७ ऑगस्टरोजी काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी ड़ॉ.ह.पि. तुम्मोड़ यांचे आदेशानुसार सदर आरक्षण सोड़त पुढे ढकलण्यात आल्याचे तहसीलदार नीलेश मड़के यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. मेहकरसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कोतवाल पदासाठीची आरक्षण सोड़त पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. कामात सुसूञता असावी, यासाठी जिल्हाधिकारी ड़ॉ. ह.पि.तुम्मोड़ यांनी यासंदर्भात १७ ऑगस्टरोजी दुपारी चार वाजता व्ही.सी. ठेवली असून, यावेळी कदाचित आरक्षण काढण्या संदर्भात पुढील तारीख जाहीर करू शकतात, असे संग्रामपूर तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी सांगितले.