पंतप्रधान मोदींच्या ‘होमपीच’वर खा. मुकूल वासनिकांना काँग्रेस पक्षवाढीचे आव्हान!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव, जिल्ह्याचे माजी खासदार तथा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार मुकूल वासनिकांचे पक्षातील वजन दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत असून, त्यांची १७ ऑगस्टरोजी पक्षाच्या गुजरात राज्य प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘होमपीच’वर पक्षवाढीचे एक प्रकारचे आव्हानच खा. वासनिकांना स्वीकारावे लागणार आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकूल वासनिक हे बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार असून, येथूनच ते देशातील सर्वात तरूण खासदार ठरले होते. तेव्हापासूनच खा. मुकूल वासनिकांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आजही खा. वासनिक आपल्या बिझी शेड्युलमध्येही बुलढाणा जिल्ह्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांचा लोकसभा निवड़णुकीत बरेचवेळा पराभवदेखील झाला तरी पक्ष संघटनेच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिल्याने पक्षातील त्यांचे वजन वाढतेच आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव असलेल्या मुकूल वासनिकांनी अनेक राज्यांचे पक्षप्रभारी म्हणून यशस्वी काम केले आहे. तर इतर देशांतही त्यांनी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. गांधी घराण्याशी जवळीक ठेवून असलेले खा.मुकूल वासनिक प्रसिध्दीपासून मात्र थोड़े दूरच राहतात. ‘वर्क अॅड़ वर्क’ अशीच छबी त्यांची पक्षात आहे.
आगामी विधानसभेच्या निवड़णुका पाहता, आता भाजपचे सरकार असलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपीच असलेल्या गुजरात राज्याच्या पक्षप्रभारापदी त्यांची नियुक्ती १७ ऑगस्टरोजी करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खारगे यांच्या सांगण्यावरून जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी सदर नियुक्ती केली आहे. भाजपशासित या राज्यात पक्षवाढीचे एकप्रकारचे मोठे आव्हानच खा. वासनिक यांना स्वीकारावे लागणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.