– ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीची पूर्वतयारीआडून काँग्रेस-ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या!
– काल रात्री अचानक जयंत पाटील, नाना पटोले ‘मातोश्री’वर पोहोचले!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मुंबईत जोरदार बैठका सुरू असून, या बैठका ‘इंडिया’ आघाडीच्या नियोजित बैठकीच्या तयारीसाठी होत असल्याचे सांगण्यात येत असले तरी, पडद्याआड काही तरी राजकारण शिजत असल्याचा संशय राजकीय धुरिणांनी व्यक्त केला आहे. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अचानक शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही भेट अचानक नसून पूर्वनियोजित असल्याचीदेखील माहिती मिळत आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असली तरी, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर या बैठकांना वेग आला आहे. इंडिया आघाडीची येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना या बैठकीची तयारी करायची आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सातत्याने भेटीगाठी आणि बैठका होत आहेत, असे सांगण्यात येत असले तरी, सद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेत असून, लोकसभा मतदारसंघनिहाय आढावांचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यात आणि काँग्रेस नेत्यांमध्ये अलिकडे प्रचंड जवळीक वाढली आहे. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसला सोबत घेऊन ते या निवडणुकांची तयारी करत असताना त्यांनी राष्ट्रवादीला गृहीत धरण्याचे टाळले असल्याचे अधोरेखीत होत असल्याने राजकीय वर्तुळांच्या भुवया उंचावलेल्या आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वा ‘मातोश्री’वर नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यातच भेट झाली होती. या भेटीवेळी चिंता आणि साशंकता व्यक्त करण्यात आली होती. कारण पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट झाली होती. अर्थात नंतर शरद पवार यांनी माध्यमांसमोर येत भूमिका मांडली. त्यानंतर आता जयंत पाटील आणि नाना पटोले ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने या तीन नेत्यांत काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र हाती आला नाही. दरम्यान, अजित पवार व शरद पवारांच्या भेटीबद्दल काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ‘येणार्या कार्यकर्त्याला तू भेटू नको, असे सांगण्याचा प्रकार नाही. कार्यकर्त्याचे स्वागत करून त्यांची मते शरद पवार ऐकून घेतात. म्हणून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते वेगवेगळ्या सल्ल्यांसाठी शरद पवारांकडे येतात.’ असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते. तरीही अलिकडे महाविकास आघाडीत जोरदार बैठकांचे सुरू झालेले सत्र पाहाता, काही राजकीय शिजत असल्याचा वास राजकीय धुरिणांना येऊ लागला आहे.
————