बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही फिड़रवर १६ ऑगस्टपासून ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ करण्यात येत आहे. १७ ऑगस्ट रोजीसुद्धा सायंकाळी सात वाजेपासून अचानक दोन तास लाईट गुल झाल्याने अनेक गावे अंधारात होती. तसेच आजही अनेक गावांत बत्तीगुल आहे, अशी माहिती प्राप्त झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने वसुली कमी असलेले ग्रामीण फिड़रवरील गावे टार्गेटवर असल्याचे समजते.
मागणी वाढली अन तुलनेत उत्पादन कमी असले की, ताळमेळ बसवण्यासाठी मग लोड़शेड़ींग घ्यावेच लागते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही फिड़रवर १६ ऑगस्टपासून ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ घेण्यात येत असल्याची माहिती आहे. यामध्ये १६ ऑगस्टरोजी रात्री नऊ वाजेपासून दोन तास लाईट गुल होती. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात जवळजवळ दोन तास अंधार होता. १७ ऑगस्ट रोजीसुध्दा सायंकाळी ६.४५ वाजेपासून रात्री ८.४५ वाजेपर्यंत ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ घेण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील संबंधित फिड़रवरील अनेक गावे दोन तास अंधारात होती. आधीच पावसाने चाट मारली असताना, त्यातच उकाडा वाढल्याने जनता हैराण असताना, अचानक लाईन गुल होत असल्याने जीवाची काहिली होत आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, जेथे वसुली कमी आहे अशा, जी १, जी २, व जी ३ अशा शेवटच्या ग्रेड़मधील ग्रामीण भागातील फिड़रवर ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मात्र एकच तारांबळ उड़त आहे. हेच ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ दिवसा घेतले तर चालणार नाही का? असाही सवाल विचारला जात आहे.
विजेचा जादा वापर व तुलनेत उत्पादन कमी, त्यातच पाऊसही कमी यामुळे ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ घेण्यात येत असून, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे खामगावचे कार्यकारी अभियंता विरेंद्र जस्मेतिया यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.