‘अल्टिमेटम’ संपला; शिस्तपालन समितीसमोर हजर होण्यास रविकांत तुपकरांचा नकार!
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे आता शेतकरी चळवळीचे लक्ष!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना दिलेला ‘अल्टिमेटम’ १५ ऑगस्टला संपला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्व तसेच वरिष्ठांबद्दल तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाच्या शिस्तपालन समितीने तुपकर यांना आपले मत मांडण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आता संपला आहे. दुसरीकडे, तुपकर यांनी शिस्तपालन समितीसमोर हजर न होता, आपले म्हणणे लेखी पत्राद्वारे मांडले असून, या पत्राचा तपशील उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे, तुपकरांच्या या पत्रावर संघटना काय भूमिका घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. ‘राजू शेट्टी यांना आपण ४-५ वर्षांपासून आपले म्हणणे वारंवार सांगत आलेलो आहे. शिवाय, शिस्तपालन समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशीही यापूर्वी फोनवरून सविस्तर चर्चा झालेली आहे. वारंवार तेच ते म्हणणे कितीवेळा मांडू…’? असे रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच म्हटले आहे. त्यानुसार ते शिस्तपालन समितीसमोर गेलेले दिसत नाहीत.
काही दिवसांपूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत तुपकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी नाव न घेता राजू शेट्टींच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. जे पदाधिकारी पक्षासाठी आपले आयुष्य वेचतात त्यांना न विचारता पदावरून त्यांची हकालपट्टी केली जाते, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला होता. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. जाहीरपणे पक्षनेतृत्वावर तसेच वरिष्ठांवर टीका करणारे तुपकर हे स्वाभिमानी संघटनेतून वेगळे होणार की काय, अशा चर्चाही रंगल्या होत्या. ते स्वाभिमानी पक्षातून वेगळे होणार असल्याचेही बोलले जात होते. तुपकर यांच्या नाराजीनंतर पक्षाने त्यांना १५ ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठीचा ‘अल्टिमेटम’ दिला होता. मात्र दिलेल्या तारखेपर्यंत तुपकर समितीसमोर हजर न राहिल्याने हा अल्टिमेटम आता संपला आहे. त्यामुळे स्वाभिमानी पक्ष आता पुढे काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच तुपकरांच्या या वागण्यामुळे स्वाभिमानी पक्षही फुटणार की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान, रविकांत तुपकर समिती समोर प्रत्यक्ष हजर झाले नसले, तरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी तसेच शिस्तपालन समिती यांना सविस्तर असे पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून आपल्या व्यथा, आक्षेप त्यांनी सविस्तरपणे व्यक्त केले आहेत. तुपकर यांनी राजू शेट्टी यांना तसेच शिस्तपालन समितीला ९ ते १० पानांचे सविस्तर पत्र दिल्याची माहिती आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडींचा व संघटनेच्या कार्याचा उल्लेख आहे. शिवाय, संघटनेची विविध आंदोलने आणि या आंदोलनातून तुपकरांसह त्यांच्या सहकार्यांवर दाखल झालेले शेकडो गुन्हे, पोलिसांचा लाठीमार, तडिपारी, तुरूंगवास असा एकंदरित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीचा आणि राजकीय प्रवास याबद्दल पत्रात उल्लेख असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना या पत्रातून मांडण्यात आल्याचे समजते.
प्रत्येक निवडणुकीत राजू शेट्टी यांची भूमिका कशी बदलत राहिली आणि त्यातून तुपकरांसह इतर धडाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कसा अन्याय झाला, हेदेखील यामध्ये नमूद आहे. गत चार ते पाच वर्षांपासून राज्यभरातील पदाधिकार्यांमध्ये असलेला रोष तुपकरांनी मांडला असून, संघटनेच्या कार्यपद्धतीवर असलेला आक्षेप यासह इतर बाबी पत्रात नमूद असल्याचे कळते. ९ ते १० पानांच्या पत्रात नेमके कोणते आक्षेप तुपकरांनी या पत्रात मांडले हे कळू शकले नाही, मात्र ९ ते १० पानांच्या या पत्रात बरेच काही नमुद असल्याचे कळते. संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि शिस्तपालन समितीकडे तुपकर यांनी मांडलेल्या आक्षेपांवर शिस्तपालन समिती आता काय कारवाई करणार? रविकांत तुपकर आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या संघटनेतील कार्यपद्धतीबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा कसा करणार? यासह राजू शेट्टी व शिस्तपालन समिती नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, शेतकरी माझा आत्मा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासाठी लढत राहीन. मला शेतकरी संघटनेतच राहून काम करायचे आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले. तसेच मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. चळवळीत राहून काम करीन. मला शेतकर्यांच्या प्रश्नासाठी लढणार्या तरूणांची फौज उभी करायची आहे, असेही तुपकर म्हणाले होते.
————