आ. रायमुलकरांविरूद्ध दलित संघटना आक्रमक; दीपकभाई केदार उद्या साबरा गावात जाणार!
मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पंचायतराज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांनी साबरा येथील ग्रामपंचायतीच्या दलित समाजातील सदस्याला अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपवरून चव्हाट्यावर आला असतानाच, आता ऑल इंडिया पॅथर सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपकभाई केदार हे उद्या (१७) मेहकरात व साबरा या गावी भेट देणार असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लीपवरून आ. रायमुलकर यांच्याविरोधात दलित संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
मेहकर येथे लवकरच राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची पास मागण्यासाठी साबरा येथील ग्रामपंचायतीचे सदस्य गजानन वानखेडे यांनी आमदार संजय रायमुलकर यांना फोन केला होता. आमदार रायमुलकर हे मुंबईत असल्याने वारंवार येणार्या फोनमुळे चिडले, आणि त्यांनी वानखेडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या अश्लील शिवीगाळची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे मेहकर मतदारसंघात पोहोचत, संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली. यामुळे दलित समाजात संतापाची लाट उसळली, व दलित संघटना आक्रमक झाली आहे. दलित समाजातील ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी उद्या (दि.१७) मेहकरात ऑल इंडिया पँथर सेना या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार येणार असून, साबरा या गावात जाऊन गजानन वानखेडे व त्यांच्या परिवाराची भेट घेणार असल्याचे कळते. यामुळे मेहकर मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
पोलिसांचे टेन्शन वाढले…..
दरम्यान, राज्य सरकारचा आगामी कार्यक्रम व आ. संजय रायमुलकर यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लीप यामुळे बुलढाणा पोलिसांसमोरचे टेन्शन चांगलेच वाढलेले आहे. त्यातच या प्रकरणात पँथर सेना संघटनेने उडी घेतल्याने दीपकभाई केदार व आ. संजय रायमुलकर हे दोन दलित नेते आमने-सामने आले आहेत. त्यामुळे उद्या मेहकर व साबरा गावात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी काटेकोर नियोजन केले असल्याची माहिती हाती आली आहे.