– जखमींवर बुलढाणा येथे उपचार सुरू, नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली!
चिखली (महेंद्र हिवाळे) – एसटीच्या खटारा गाड्यांचे अपघात सुरूच असून, बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी जीवितहानी टळली आहे. सवणा-चिखली मार्गावर भरधाव असलेल्या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने व स्टेअरिंगही फ्री झाल्याने ही बस सरळ दहा फूट दरीत जाऊन कोसळली. सवणा येथून चिखलीकडे येताना वळती गावाजवळ सकाळी साडेसहा वाजता हा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 विद्यार्थ्यांसह 40 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला चिखली व नंतर बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाल्याने परिसरातील पालकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. महामंडळाच्या अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले होते. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात एकच गर्दी केली हाेती.
सवणा येथून चिखलीकडे येणारी (एमएच २० डी ९३६७) एसटी बस विरुद्ध दिशेने १० फुट खोल दरीत कोसळली. बसमध्ये प्रामुख्याने शाळकरी मुलांचा भरणा होता. प्राप्त माहितीनुसार, मुले व मुली शिकवणी वर्गासाठी चिखलीला जात होते. सवणा येथून बस चिखलीकडे जात असताना वळती गावाजवळ ‘स्टेअरिंग फ्री’ झाले व ब्रेक न लागल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस दरीत घसरत गेली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेने विद्यार्थी, विद्यार्थिनींना मोठा मानसिक धक्का बसला होता. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत व बचावकार्य केले. घटनास्थळी पोलिस, एसटी महामंडळाचे अधिकारी तातडीने दाखल झाल्यानंतर जखमींना सुरूवातीला चिखली व नंतर बुलढाणा येथे हलविण्यात आले. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले असून, त्यात बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी आहेत. पैकी सहा विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
गाडीचे स्टिअरिंग रॉड लॉक झाल्याने बसची पलटी झाल्याचे चालकाने सांगितले. या अपघातात दहा ते पंधरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने चिखली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातात चालकसुद्धा जखमी झाला आहे. अपघात झालेला रस्ता अरुंद असल्याचे दिसत आहे. या अपघातामुळे एसटी महामंडळाचा नादुरुस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे.