BULDHANACrimeHead linesMEHAKARVidharbha

मेहकरात सायबर भामट्यांचा पॅथॉलॉजीचालकास तब्बल ६२.६७ लाखांना चुना!

– बुलढाणा सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

मेहकर (अनिल मंजुळकर) – विदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या नावाखाली मेहकर येथील पॅथॉलॉजी चालकास एका महिलेने तब्बल ६२ लाख ६७ हजार रूपयांचा ऑनलाईन चुना लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पोलिसांनी तांत्रिक सहाय्याने तपास सुरू केला होता. फेसबुकवर मारिया जोन्स या महिलेच्या नावाने असलेल्या संबंधित भामट्याने दीड महिन्यादरम्यान या पॅथॉलॉजी चालकाकडून हे पैसे उकळले आहेत. या घटनेने मेहकरात एकच खळबळ उडालेली आहे.

सविस्तर असे, की शहरातील गजानन नगरमध्ये रहाणारे दीपक शिवराम जैताळकर (वय ५०) यांची डीपीरोडवर पॅथॉलॉजी लॅब आहे. २३ जून रोजी जैताळकर यांना मारिया जोन्स या महिलेची फेसबुकवर फ्रेंडरिक्वेस्ट आली होती. ती जैताळकर यांनी स्वीकारली. संबंधित महिलेने आपण फार्मासिस्ट असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे एकाच व्यवसायात दोघेही काम करत असल्याने त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. ११ जुलैपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. दरम्यान, त्यानंतर संबंधित महिलेने आपले प्रमोशन झाले असून, त्यामुळे आनंदी आहोत. त्यानुषंगाने एक गिफ्ट पाठवायचे असल्याने जैताळकर यांना त्यांच्या घराचा पत्ता संबंधित महिलनेने मागितला. जैताळकर यांनी त्यांच्या पॅथॉलॉजी लॅबचा पत्ता दिला होता.
दरम्यान १३ जुलै रोजी जैताळकर यांना त्यांचे पार्सल दिल्ली एअरपोर्टवर आल्याचे समजले. सोबतच ३५ हजार रुपये कस्टम क्लिअरसाठी द्यावे लागणार, असे सांगण्यात आले. सोबतच पार्सलमध्ये ६५ हजार (जीबीपी) ग्रेट ब्रिटन पाऊंड असल्याचे सांगण्यात आले. त्यापोटी वेळोवेळी जैताळकर यांच्याकडून मनी लॉर्न्डींग सर्टीफिकेट, सर्व्हीस चार्जेस, ज्युडिशियल एप्रुवल, एटीएम मास्टर कार्डच्या नावाखाली वेगवेगळ्या व्यक्तींनी तब्बल ६२ लाख ६९ हजार ७०० रुपये उकळले. इतके पैसे हातातून गेले तरी ते गिफ्टचे पाकिट काही जैताळकर यांच्या हाती आले नाही. १३ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान या रकम्या उकळण्यात आल्यात. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच, जैताळकर यांनी त्यांचे मित्र अ‍ॅड. एल. पी. ठोकरे व इतरांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी हा एक फ्राड असल्याची बाब जैताळकर यांच्या निदर्शनास आणून दिली व तातडीने पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, जैताळकर यांनी बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात १५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बुलढाणा सायबर पोलिस करत आहेत.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!