BULDHANAHead linesVidharbha

बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

– स्वातंत्र्यदिनी पदक देऊन होणार सन्मान

बुलढाणा (संजय निकाळजे) – सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील सुपुत्र तथा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक संतोष डोंगरे यांना सेवेत सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबद्दल उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनी हे पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे जिल्ह्याची मान उंचावली असून, जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील संतोष रामचंद्र डोंगरे हे सन २००० मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले. आतापर्यंत त्यांनी २३ वर्षे उत्तम सेवा बजावली आहे. यादरम्यान मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, नक्षलग्रस्त भाग छत्तीसगढ, प्रधानमंत्री सुरक्षा दिल्ली (एसपीजी), जम्मू काश्मीर अमरनाथ यात्रा येथे २०२२ मध्ये यशस्वीपणे ड्युटी निभावली. यावर्षी सुद्धा म्हणजे २०२३ मध्ये ते अमरनाथ यात्रा सुरक्षा ड्युटीवर कार्यरत आहेत. सेवेत कार्यरत असतांना सर्वच ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या एकंदरीत कामगिरीचे मूल्यमापन करुन उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. पोलीस महानिदेशक (डिजीपी) महानिदेशालय नवी दिल्ली यांच्यावतीने हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
शिपाई ते पोलीस निरीक्षक असा संतोष डोंगरे यांचा जीवनप्रवास खूप संघर्षमय राहिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले. अकरावी ते बीए त्यांनी बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयात शिक्षण घेतले. याच दरम्यान सन २००० मध्ये सीआरपीएफ दलात शिपाईपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २०१० मध्ये विभागीय स्पर्धा परीक्षेतून ते उपनिरीक्षक झाले. तर २०१९ मध्ये त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली.


अशी होते निवड…

केंद्रीय राखीव पोलीस दल हे भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिकाराखाली कार्य करते. देशात जवळपास साडेतीन लाख सीआरपीएफ सैनिक आहेत. यापैकी सर्वोत्तम कामगिरी बजावणार्‍यांची उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड होते. दरवर्षी याचे प्रमाण केवळ एक टक्का असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!