BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

बुलढाणा ‘लोकसभा’ लढविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली!

– निरीक्षक नानाभाऊ गावंड़े, जिल्हा समन्वयक मदन भरगड़ जाणून घेणार स्थानिक नेत्यांची मते!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली असून, पूर्वी एरव्ही आघाड़ीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनेही दावा सांगायला सुरूवात केल्याची माहिती हाती आली आहे. त्याचदृष्टीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने उद्या (दि.१४) स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात दुपारी साडेबारा वाजता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक नानाभाऊ गावंड़े व जिल्हा समन्वयक मदन भरगड़ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हे दोन नेते जिल्ह्याची यासंदर्भातील तयारी चाचपून पाहणार आहेत.

लोकसभा निवड़णुकीला अवघे नऊ महिने बाकी असले तरी कधीही निवड़णूक लागू शकते, असाही राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. त्याचदृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यावेळी काँग्रेसही महाविकास आघाडीकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आलेली आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस जणांची महत्त्वपूर्ण बैठक बुलढाणा येथील बाजार समितीच्या सभागृहात उद्या, दि. १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता आयोजित केली आहे. बैठकीत लोकसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक तथा खा.मुकूल वासनिक यांचे विश्वासू नागपूरचे नानाभाऊ गावंड़े व जिल्हा समन्वयक अकोल्याचे मदन भरगड़ हे नेते उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षसंघटनात्मक स्थितीबाबत चर्चा यावेळी होणार असून, महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष जसे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासह इतर पक्षांची सद्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा, तसेच सत्ताधारी घटक पक्षांची सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राजकीय स्थिती यावेळी जाणून घेतली जाणार आहे. प्रदेश काँग्रेसने आदेशीत केलेल्या बैठकीला आजी-माजी आमदार, अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, शहर व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, Frontal सेलचे अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य यांनी या बैठकीला आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केलेले आहे, असे जिल्हा सरचिटणीस सतिष मेहेंद्रे व जिल्हा काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख श्लोकांनद डांगे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!