Breaking newsHead linesPachhim MaharashtraSOLAPUR

शरद पवार यांचे सोलापुरात जंगी स्वागत!

– शरद पवार यांच्यामुळेच सोलापूरला आयटी पार्क मिळाले – महेश कोठे
– तब्बल चार जेसीबींच्या सहाय्याने पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी!

सोलापूर (हेमंत चौधरी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे रविवारी सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. चार जेसीबींचा वापर करून पवार यांच्या वाहन ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर सोलापूरकरांचे आयटी पार्कचे स्वप्न केवळ शरद पवार यांच्यामुळेच पूर्ण झाले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापाैर महेश कोठे यांनी दिली. तर सांगोल्यात माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. शरद पवार यांनी पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आले होते.

https://twitter.com/i/status/1690660259210387456

सोलापुरात नवीन आयटी हब प्रकल्पाचे भूमिपूजन आणि सांगोल्यात शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार हे सोलापुरात आले होते. विमानतळापासून ते डोणगाव रस्त्यावरील नवीन आयटी हब प्रकल्प भूमिपूजन स्थळापर्यंत आणि नंतर तेथून मरिआई चौक, मंगळवेढामार्गे सांगोल्यात जाईपर्यंत ठीकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. यात तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला.
आयटी पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते तथा माजी महापाैर महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशावेळी झालेल्या गोष्टींवर प्रथमच भाष्य केले. ते म्हणाले की, त्यावेळी मी आमदारकीबरोबरच सोलापुरात आयटी पार्क मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तेव्हा, आमदारकी मी आता तुम्हाला देऊ शकत नाही. कारण, आता आमची यादी पक्की आहे. अनेक जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागणार आहे, असे पवारांनी सांगितले होते. मात्र, आयटी पार्कबाबत खात्री दिली होती. त्यामुळे पवारांशिवाय सोलापूरचे आयटी पार्क हे स्वप्नच राहिले असते, असे महेश कोठे यांनी स्पष्ट केले.
विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून अजित पवार गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेले शरद पवार हे प्रथमच सोलापुरात आले होते. विमानातळावरून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी प्रचंड गर्दी केली होते. हे चित्र त्यांचा वाहन ताफा पुढे जात असताना मार्गावर अनेक ठिकाणी दिसून आले. पवार यांनीही मोटारीतून खाली उतरून स्वागत स्वीकारत अभिवादन केले. तेव्हा पवार यांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून जात होता. डोणगाव रस्त्यावरून जात असताना वाटेत पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी चार जेसीबींचा वापर करून पवार यांच्या वाहन ताफ्यावर जोरदार पुष्पवृष्टी केली. घोंगडीही देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. यात महिला आणि तरुण कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग उल्लेखनीय होता. पवार हेसुद्धा प्रेमाचे स्वागत स्वीकारताना कार्यकर्त्यांच्या गर्दीत सामील होऊन उत्साह वाढवत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!