CrimeVidharbhaWARDHA

सेलू मुरपाड येथे सराईत गुन्हेगाराची जमावाकडून निर्घृण हत्या

– गावात तणावपूर्ण शांतता

वर्धा (प्रकाश कथले) – हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथे जामिनावर सुटून आलेल्या सराईत गुन्हेगाराने दुचाकी पाडून टाकत जमावावर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दगड, लाठी काठीने मारहाण करीत त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी (ता.९) रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर अटक केलेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आकाश उल्हेश उईके (वय ३२) रा.सेलू मुरपाड हे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सद्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

पोलिसांनी आकाश उईके याच्या खून प्रकरणात गजानन खडसे, पांडुरंग देवतळे, प्रकाश खडसे आणि शरद सातपुते यांच्यासह १० ते १५ जणांना चौकशीकरीता ताब्यात घेतले आहे. आकाश उईके हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा युवक होता. त्याच्याविरुद्ध पोलिसांत दरोडा, लूटमार, मारहाण करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची सेलू मुरपाड गावातही दहशत होती. अलिकडेच तो जामिनावर सुटल्याने गावात आला होता. काल रात्री तो दारू प्यायला गावात गेला. पण दारू न मिळाल्याने तो संतापला होता. परत येताना त्याने गावातील प्रकाश खडसे यांनी रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या दुचाकीला लाथ मारून पाडले. त्यानंतर त्याने तेथेच वाद उपस्थित केला. आकाश उईके याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून गावातील १० ते १५ युवक त्याला अद्दल घडविण्याच्या दृष्टीने एकत्र आले. हे पाहताच तो पळत असताना त्याचा पाठलाग करून त्याला दगड, काठीने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला.रात्री १०:३० चेदरम्यान आकाश उईके याची वहिनी मनिषा उईके हिने हिंगणघाट पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी त्याला पोलिसांच्या गाडीनेच उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालयात घेवून आले. उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मारहाण करणार्‍यातील काहींनी स्वतः पोलिस ठाण्यात येवून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, पोलिस निरीक्षक मारुती मुळुक सहकारी पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्याच्या कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिस तपास करीत आहे. सेलू मुरपाड गावात शांतता आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!