– बुलढाण्यामुळे नजीकच्या जळगाव जिल्ह्यातही आले डोळे!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार ४६६ जणांचे डोळे आलेले असून, डोळे येण्यात जिल्हा राज्यात क्रमांक एकवर पोहोचला आहे. बुलढाणा जिल्ह्याखालोखाल जळगाव (१९,६३२), नांदेड (१४०९६) आणि अमरावती (१२२९०) या जिल्ह्यांचा नंबर लागतो. राज्यात सद्या दोन लाख ४८ हजार लोकांचे डोळे आलेले असून, ही साथ वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीने साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागलेला आहे.
जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांत डोळे आलेल्यांची सर्वाधिक संख्या असून, या भागाला नुकताच पूरस्थितीचा फटका बसलेला आहे. तर शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद हे तालुका खान्देशला लागून असल्याने या भागातील ही साथ नजीकच्या जळगाव जिल्ह्यात पोहोचली आहे. सद्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण, आणि वैद्यकीय उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथके तैनात केली असून, साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
ज्या भागात डोळे येण्याची साथ पसरली आहे, त्या भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जात आहेत. तसेच, सर्व शाळांमध्येही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन औषधी दिली जात आहे. आरोग्य अधिकार्यांनी सांगितले, की दरवर्षी या काळात डोळ्याचे रूग्ण पाहायला मिळतात. वैद्यकीय भाषेत याला ‘व्हायरल कंजंक्टिव्हायटिस’ असे म्हणतात. यामध्ये डोळे लाल होऊन चुरचुरण्याचा त्रास रुग्णांना जाणवतो.
—–