Breaking newsHead linesMaharashtraMarathwada

सप्टेंबरमध्ये एसटी कर्मचार्‍यांची पुन्हा संपाची हाक!

– पगारवाढ, पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
– ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्य सरकारचे टेन्शन वाढले!

छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी) – पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी ११ सप्टेंबररोजी संपावर जाण्याचा इशारा राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांच्या मान्यताप्राप्त संघटनेकडून देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जर सरकारने आमचे ऐकले नाही, तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यासह प्रत्येक आगारात कर्मचारी कामबंद करून उपोषणाला बसणार, असा इशाराही कामगार संघटनेने दिला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कोर कमिटीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत करारातील तरतुदीनुसार सरकारने ४२ टक्के महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे. याशिवाय, मूळ वेतनात जाहीर झालेल्या ५ हजार, ४ हजार तसेच अडीच हजारांमुळे ज्येष्ठ कर्मचार्‍यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. गणपतीचा सण १९ सप्टेंबरला आहे, त्याआधीच एसटी कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिल्याने प्रवाशांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना एसटी कर्मचार्‍यांनी सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आल्याने राज्यातील शिंदे-पवार-फडणवीस सरकारचे टेन्शन चांगलेच वाढलेले आहे.


या आहेत एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या…

– शासकीय कर्मचार्‍यांना देय असलेला ४२ टक्के महागाई भत्ता तत्काळ लागू करण्यात यावा.
– प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा. तसेच घरभाडे भत्ता, पगारवाढीतील फरक तत्काळ अदा करण्यात यावा.
– वरिष्ठ कर्मचार्‍यांचे घोषित ५ हजार, ४ हजार आणि अडीच हजार रुपयांचे वेतन काढून घ्यावे.
– शिल्लक रकमेचे वाटप त्वरीत करण्यात यावे.
– १० वर्षांसाठी ७ वा वेतन आयोग लागू करावा. खासगी गाड्यांऐवजी नवीन खासगी बसेसचा पुरवठा वाढवा.
– सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये विद्यमान कर्मचार्‍यांसह कुटुंबीयांना फॅमिली पास देण्यात यावा.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!